कुपवाड्यात 'ऑपरेशन पिंपल'
नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळला : दोन दहशतवाद्यांचा खात्मा
वृत्तसंस्था/ कुपवाडा
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न उधळून लावला आहे. भारतीय लष्कराने या ऑपरेशनला ‘ऑपरेशन पिंपल’ असे नाव दिले आहे. शुक्रवार, 7 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून शनिवारीही दिवसभर संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू होती.
कुपवाडा जिह्यातील केरन सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली होती. लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यासंबंधीची माहिती शेअर केली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी संयुक्तपणे व्यापक रणनीती आखली. भारतीय सैनिकांची घुसखोरांशी चकमक सुरू झाल्यानंतर त्यात दोघे ठार झाले. चिनार कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) तैनात असलेल्या सतर्क सैनिकांनी संशयास्पद हालचाली पाहिल्यानंतर त्यांनी लगेच दहशतवाद्यांना आव्हान दिले. प्रत्युत्तरात, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे सैन्य आणि घुसखोरांमध्ये चकमक झाली.
लष्कर आणि घुसखोर यांच्यातील चकमकीत दोन्ही दहशतवादी मारले गेले. लष्कराच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई नियंत्रण रेषेजवळील यापूर्वी अनेक घुसखोरीचे प्रयत्न झालेल्या ठिकाणीच घडली आहे. या कारवाईत सहभागी असलेल्या सैन्याने परिसराला वेढा घालत दहशतवादी पळून जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. लष्कराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर माहिती शेअर केला. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेल्या ‘ऑपरेशन पिंपल’मध्ये भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने भाग घेतला होता.
हिवाळा सुरू होण्यापूर्वी घुसखोरीचे प्रयत्न
जम्मू काश्मीरमध्ये हिवाळा सुरू होण्यापूर्वी सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न तीव्र होतात. या काळात भारतीय सुरक्षा दलाकडूनही व्यापक तयारी केली जात असल्यामुळे चकमक होते. घुसखोरीचे बहुतेक प्रयत्न सैन्य आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडले जातात. तीन दिवसांपूर्वी किश्तवाड जिह्यातील दुर्गम भागात असलेल्या छत्रू येथे दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. सुरक्षा यंत्रणांना या भागात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्स आणि पोलिसांच्या संयुक्त पथकांनी कारवाईत भाग घेतला. छत्रू परिसरामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय होता.
Comments are closed.