अमेरिका भारताला आणखी 113 तेजस मार्क-1ए इंजिन पुरवणार आहे
‘एचएएल’चा अमेरिकन कंपनीशी करार : हवाई दलाची ताकद वाढण्यास मोठी मदत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि अमेरिकन दिग्गज जनरल इलेक्ट्रिक कंपनी (जीई) यांनी एक मोठा संरक्षण करार केला आहे. या करारात 113 युनिट्सच्या एफ404-जीई-आयएन20 इंजिनांचा पुरवठा आणि एक सपोर्ट पॅकेज समाविष्ट आहे. ही इंजिने 97 तेजस एमके1ए विमानांमध्ये बसवली जातील. स्वदेशी तेजस एलसीए एमके1ए लढाऊ विमानांसाठी सप्टेंबर 2025 मध्ये करार आधीच अंतिम झाला आहे. आता इंजिन डिलिव्हरी 2027 ते 2032 दरम्यान करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भारत आपल्या संरक्षण क्षेत्राला बळकट करण्याच्या मोहिमेवर काम करत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, सरकार या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. एचएएल आणि ‘जीई’मधील हा करार त्या दिशेने एक मोठे पाऊल असल्यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाने एचएएला दिलेल्या ऑर्डरद्वारे भारतीय हवाई दलासाठी लढाऊ विमाने खरेदी केली जातील. यापूर्वी, फेब्रुवारी 2021 मध्ये, मंत्रालयाने 83 तेजस विमानांच्या खरेदीसाठी 48,000 कोटींचा करार केला होता. हा नवीन करार एचएएल आणि ‘जीई’मधील दुसरा मोठा करार आहे. या करारान्वये इंजिन पुरवठा 2027 मध्ये सुरू होणार असून तो 2032 पर्यंत पूर्ण होणार आहे.
Comments are closed.