सेफ्टी पिनची किंमत किती आहे?

आपल्या सर्वांना ‘सेफ्टी पिन’ ही वस्तू माहीत आहे. ही वस्तू विशेषत: महिलांच्या उपयोगाची असते. साडी-दुपट्टा वाऱ्यासमवेत उडू नये, म्हणून सेफ्टी पिन लावली जाते. अन्यही अनेक कामांसाठी तिचा उपयोग केला जातो. अशा या अत्यंत छोट्या आणि कोठेही मिळणाऱ्या वस्तूची किंमत काय असावी, असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. वास्तविक असा प्रश्न पडण्याचे काहीच कारण नाही, इतकी ही वस्तू स्वस्त आहे, असे आपण म्हणाल. सर्वसामान्य दृष्टीने आपले म्हणणे योग्यही आहे. तथापि, तरीही हा विषय सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे.

एखाद्या सामान्य आणि किरकोळ वस्तूलाही जर प्रसिद्ध अशा ‘ब्रँड’ची पार्श्वभूमी लाभली, तर तिचे अक्षरश: कसे ‘सोने’ होऊ शकते, हे आपल्याला या घटनेवरुन समजते. विशेषत: फॅशनच्या क्षेत्रात अशा प्रत्यक्षात किरकोळ पण ‘ब्रँड’ची छत्रछाया लाभल्याने प्रचंड महाग असलेल्या वस्तूंची चलती असते. ‘प्राडा’ (याचा उच्चार ‘प्रादा’ असाही केला जातो) नामक एक फॅशन कंपनीने ही सेफ्टी पिन लाँच केली आहे. हा ब्रँड फॅशनच्या क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय पण महागडा ब्रँड आहे. या ब्रँडच्या या सेफ्टी पिनची किंमत 69 हजार रुपये इतकी आहे. आपण जी वस्तू 10 रुपये किंवा फारतर 20 रुपये डझन या भावाने विकत घेतो, तिची किंमत या ब्रँडमुळे इतकी प्रचंड आहे. एव्हढ्या अफाट किंमतीला ही वस्तू विकत घेणारे ग्राहकही आहेतच. कारण त्याशिवाय ही वस्तू इतक्या किमतीला बाजारात आणली गेलीच नसती. साधी सेफ्टी पिन आणि ही पिन यात अंतर एवढेच आहे, की या चतुर कंपनीने या पिनला एक लोकरीचे आवरण घातले आहे. त्यामुळे या पिनचे रुपांतर ‘सेफ्टी पिन ब्रोच’ मध्ये झाले आहे. केवळ इतकेच परिवर्तन करुन इतकी मोठी किंमत घेतली जात आहे. या पिनचा धातू नेहमीच्या पिनसारखा नाही. तो अधिक मौल्यवान आहे.

 

Comments are closed.