दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाचा कमाल पराक्रम; 'या' विक्रमात दिग्गज ग्रेम स्मिथलाही टाकले मागे

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना 8 नोव्हेंबर रोजी फैसलाबाद क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला असला तरी त्यांचा सलामीचा फलंदाज क्विंटन डी कॉकने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या सामन्यात डी कॉकने शानदार अर्धशतक झळकावले.

फैसलाबादमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान, क्विंटन डी कॉकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7,000 धावाही पूर्ण केल्या. डी कॉकने माजी दिग्गज कर्णधार ग्रॅमी स्मिथला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. त्याने ग्रॅमी स्मिथला मागे टाकले, ज्याने 196 डावांमध्ये 6,989 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम जॅक कॅलिसच्या नावावर आहे, ज्यांनी 11,550 धावा केल्या आहेत. एबी डिव्हिलियर्सने 9427 धावा केल्या आहेत आणि हाशिम अमलाने 8113 धावा केल्या आहेत. हर्शेल गिब्सच्या नावावर 8094 धावा आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत क्विंटन डी कॉकने तिन्ही सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली. या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला. यासह, क्विंटन डी कॉक एकदिवसीय क्रिकेट इतिहासात सर्वाधिक मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे. त्याने एमएस धोनीच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. धोनीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत सात वेळा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. आता, डी कॉकने सातव्यांदा ही कामगिरी करून धोनीच्या विक्रमाशीही बरोबरी केली आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला सात विकेट्सने हरवून मालिका 2-1 अशी जिंकली. लेग-स्पिनर अबरार अहमदने कारकिर्दीतील सर्वोत्तम 4/27 गोलंदाजी करत पाकिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा संघ 37.5 षटकांत 143 धावांतच सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेने त्यांचे शेवटचे आठ विकेट्स फक्त 37 धावांत गमावले. त्यानंतर पाकिस्तानने फक्त 25.1 षटकांत 3 बाद 144 धावा करून मालिका जिंकली. संघाकडून सॅम अयुबने सर्वाधिक 77 धावा केल्या.

Comments are closed.