रायगड, पालघरमधील आंबा बागायतदारांना पीक विम्याची फुटकी कवडी मिळाली नाही, प्रिमियम चारपट वसूल करूनही मदत मिळेना

अवकाळी पाऊस, थंडीने मारलेल्या दडीमुळे गेल्या वर्षी कोकणातील हापूसला मोठा फटका बसला असला तरी रागयड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. २०२५-२६ या हंगामातील विम्याचा प्रिमियम भरण्याची मुदत येत्या ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तरीही गेल्या वर्षी उतरवलेल्या विम्याचे पैसे मिळाले नाहीत. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून विमा कंपन्यांनी चारपट वाढीव प्रिमियम वसूल केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून विमा कंपन्यांनी २०२१ ते २०२४ या कालावधीत हेक्टरी सात हजार रुपये प्रिमियम घेतला आहे. हाच प्रिमियम रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारपट वाढवण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी २९ हजार ४०० रुपये प्रिमियम भरावा लागला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिवाळीपूर्वी मिळाली आहे. मात्र रायगड जिल्ह्यातील व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ती अजूनपर्यंत मिळाली नाही.

तातडीने नुकसानभरपाई द्या

विमा कंपन्यांनी प्रिमियमच्या रकमेत वाढ केल्यानंतर गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांपैकी फक्त ५ हजार २३५ शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागांचा विमा उतरवला. रायगडमध्ये आंब्याचा विमा उतरवलेले क्षेत्र फक्त ३ हजार ९८१ हेक्टर आहे. कमी क्षेत्र असतानाही विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्यास दिरंगाई केली जात आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्याकडे करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले.

Comments are closed.