Los Angeles Olympics 2028 : भारत सरळ ऑलिंपिकमध्ये; पाकिस्तानला अजूनही ‘क्वालिफायर’ची धडपड
लॉस एंजेलिस ऑलिंपिक 2028 मध्ये क्रिकेट पुन्हा एकदा रंगणार असून तब्बल 128 वर्षांनंतर हा खेळ ऑलिंपिकच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. अलीकडेच दुबईत झालेल्या आयसीसी बोर्ड बैठकीत क्रिकेटच्या स्पर्धेचे स्वरूप, संघांची निवड आणि पात्रता प्रक्रिया जाहीर करण्यात आली. पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागांत टी-20 स्वरूपातील सामने खेळवले जाणार असून हे सामने 12 ते 29 जुलै या कालावधीत पोमोना फेअरग्राउंड्स, लॉस एंजेलिस येथे पार पडणार आहेत.
या स्पर्धेत प्रत्येकी 6 पुरुष आणि 6 महिला संघांचा समावेश असेल. आयसीसीनुसार 5 भौगोलिक प्रदेशांतील सर्वोच्च रँक असलेल्या संघांना थेट प्रवेश मिळेल, तर उर्वरित एक संघ जागतिक पात्रता स्पर्धेतून ठरवला जाणार आहे. आशिया विभागातून भारताला थेट प्रवेश मिळणार असला तरी पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशला पात्रता फेरीतून मार्ग काढावा लागणार आहे. ओशिनियातून ऑस्ट्रेलिया, युरोपातून इंग्लंड आणि आफ्रिकेतून दक्षिण आफ्रिका या संघांची एन्ट्री निश्चित आहे, तर न्यूझीलंड, आयर्लंड आणि इतरांना क्वालिफायर खेळावे लागतील.
वेस्टइंडिज आणि अमेरिकेच्या सहभागाबाबत मात्र संभ्रम कायम आहे. कारण वेस्टइंडिज क्रिकेटमध्ये एकत्र खेळतो, परंतु ऑलिंपिक स्पर्धेत कॅरिबियन देश स्वतंत्रपणे सहभागी होतात. यजमान म्हणून अमेरिकेची थेट निवड होणार की प्रदेशीय मानांकन लागू राहील, यावर आयसीसी-आयओसीची अंतिम घोषणा अद्याप बाकी आहे. यामुळे पाकिस्तानसह अनेक संघांसाठी ऑलिंपिकचे तिकीट मिळवण्याचा मार्ग आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, याआधी क्रिकेट फक्त एकदाच 1900 च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळण्यात आले होते, ज्यात ग्रेट ब्रिटनने सुवर्णपदक पटकावले होते.
Comments are closed.