‘मातोश्री’जवळ उडणाऱ्या ड्रोनचं रहस्य आलं समोर; मुंबई पोलिसांनी केला खुलासा, जाणून घ्या…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आणि लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ‘मातोश्री’ निवासस्थानाजवळ ड्रोन घिरट्या घालत असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ‘मातोश्री’वरील सुरक्षा जवानांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी याचा व्हिडीओ चित्रित केला.

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर ‘मातोश्री’जवळ ड्रोन घिरट्या घालत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या ‘मातोश्री’ निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या ‘मातोश्री’च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. याबाबत आता मुंबई पोलिसांनी खुलासा केला आहे.

पोलिसांचा खुलासा

‘मातोश्री’जवळ ड्रोन घिरट्या घालत असल्याचे वृत्त पसरल्यानंतर चिंता व्यक्त केली जाऊ लागली. यानंतर मुंबई पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून या परिसरात सर्व्हेक्षण केले जात असून यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. वांद्रे आणि बीकेसी परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणासाठी एमएमआरडीएकडून ड्रोन उडवले जात असून याची रीतसर परवानगीही घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.

Comments are closed.