लालपरी घेणार आता व्यावसायिक भरारी, प्रवासी वाहतुकीसोबतच एसटी महामंडळ उभारणार पेट्रोल पंप, चार्जिंग स्टेशन
उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठे पाऊल उचलले आहे. राज्यभरातील स्वतःच्या जागांवर एसटी महामंडळ लवकरच 250 पेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटसह किरकोळ विक्री केंद्र (रिटेल फ्युएल पंप) सुरू करणार आहे. बससोबत व्यवसायही गतिमान या धर्तीवरचा हा उपक्रम महामंडळाच्या आर्थिक पुनरुत्थानाला नवी ऊर्जा देईल का? हे पाहावे लागणार आहे.
महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारे वाहतुकीचे सर्वात मोठे सार्वजनिक जाळे आहे. दररोज सुमारे कोटीहून अधिक प्रवासी एसटीच्या 16 हजारांहून अधिक बसेसद्वारे प्रवास करतात. राज्यातील दुर्गम भाग, गावे आणि लहान शहरांपर्यंत पोहोचणारी ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नसून लाखो लोकांच्या रोजीरोटीचा आधार आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत वाढते डिझेल दर, प्रवासी संख्येतील घट यामुळे एसटीची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. फक्त प्रवासी तिकीट महसुलावर अवलंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे नवे उत्पन्न स्त्रोत निर्माण करणे आवश्यक आहे. गेल्या सात दशकांपासून एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून डिझेल विकत घेत आहे. सध्या 251 ठिकाणी एसटीच्या स्वतःच्या जागेवर पंप आहेत, पण ते केवळ एसटीच्या बसेससाठी वापरले जातात.
या अनुभवाच्या जोरावर आता महामंडळाने सर्वसामान्य ग्राहकांसाठीही इंधन विक्री केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या एसटीच्या जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे 250 ठिकाणी जागा निश्चित केल्या आहेत. या ठिकाणी इंधन विक्रीसोबत रिटेल शॉप्स, विश्रांतीगृहे आणि चार्जिंग सुविधा उभारण्याचा मानस आहे. यातून एसटीला स्थिर व दीर्घकालीन महसूल मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
एसटी महामंडळाला कसा फायदा होणार?
महामंडळाच्या पडिक जागांचा व्यावसायिक उपयोग
स्थिर आणि दीर्घकालीन महसूल स्रोत
सार्वजनिक-खासगी भागीदारीतून आधुनिक पायाभूत सुविधा
सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि ई-चार्जिंग एकाच छताखाली
रिटेल शॉप्स आणि सेवांमुळे स्थानिक रोजगार संधी
Comments are closed.