IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत शानदार कामगिरीसाठी भारताच्या या खेळाडूला मिळाला ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सीरीज’चा सन्मान

ऑस्ट्रेलियामधील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवताना, युवा ऑफ-स्पिन अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या शांत पण महत्त्वपूर्ण कामगिरीची दखल घेतली गेली आहे. 26 वर्षीय सुंदरला ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सीरिज’ म्हणून निवडण्यात आले.
भारताच्या आक्रमक क्रिकेट संघात वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) हा असा खेळाडू ठरला ज्याने संपूर्ण संघात संतुलन निर्माण केलं.

शनिवारी ब्रिस्बेनमध्ये वीज पडणे आणि मुसळधार पावसामुळे पाचवा टी-20 सामना रद्द झाला, पण तरीही भारताने मालिकेतील या यशाचा आनंद घेत ट्रॉफी उंचावली.

बीसीसीआयने रविवारी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये या रोमांचक मालिकेनंतरच्या काही खास क्षणांची झलक दिसली. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी जाहीर केले की, संघाचे ऑपरेशन्स मॅनेजर राहिल खाजा विजेत्या खेळाडूला पदक प्रदान करतील.
राहिल यांनी थोडक्यात सुंदरचे नाव घेतले आणि त्याच्या गळ्यात सुवर्णपदक घातले. वॉशिंग्टनने राहिलच्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानले आणि भारताच्या विजयात योगदान देण्याचा आनंद व्यक्त केला.

बीसीसीआयने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये राहिलच्या शेजारी उभा असलेला सुंदर म्हणाला,त्यांच्या हातून हे पदक मिळणं खूप खास आहे. ते दररोज किती मेहनत घेतात, हे आम्हाला माहित आहे त्यांच्या मेहनतीमुळे आमचं काम सोपं होतं. ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी मिळाली आणि टीमच्या विजयात योगदान देता आलं, याचा मला खूप आनंद आहे.

पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये वॉशिंग्टनला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता. मात्र, शेवटच्या तीन सामन्यांसाठी त्याचं प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झालं आणि त्याने लगेचच आपला ठसा उमटवला. गोलंदाजीमध्ये फारशी संधी न मिळाल्यानेही सुंदरने 23 चेंडूत नाबाद 49 धावा (3 चौकार, 4 षटकार) ठोकून भारताला 186 धावांचं लक्ष्य सहज पार करत 5 गडी राखून विजय मिळवून दिला.

चौथ्या टी-20 सामन्यात त्याने 7 चेंडूत 12 धावा केल्या आणि 1.2 षटकांत 3 धावा देऊन 3 बळी घेतले, ज्यात मार्कस स्टोइनिस (17) आणि ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या फळीतील फलंदाजांचा समावेश होता.
या कामगिरीमुळे भारताने मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी मिळवली.

Comments are closed.