Pune News – बिबट्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी महिलांची अनोखी शक्कल, टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घातला

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागात बिबट्यांचे हल्ले वाढत आहेत. गेल्या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सतत बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम कसं करायचं हा प्रश्न गावकऱ्यांसमोर आहे. यामुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण होण्यासाठी पिंपरखेडमधील दोन महिलांनी अनोखी शक्कल लढवली आहे. महिला शेतात जाताना टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घालून जात आहेत.

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दोन लहान मुले तर जांबुत येथे एका वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता. रात्रंदिवस या संपूर्ण परिसरात बिबट्या कधी कुठे निदर्शनास येईल याचा नेम नाही. त्यामुळे त्या तालुक्यांच्या गाव वाडीवस्त्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली जगत आहे. अशातच स्वरक्षणासाठी महिलांवर गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ आली आहे.

पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला असून बिबट्याच्या हल्ल्यापासून आपलं संरक्षण व्हावे यासाठी नागरिक वेगवेगळी शक्कल लढवत आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील उषा ढोमे आणि सुनिता ढोमे या महिलांनी अनोखी शक्कल लढवत गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेले पट्टा स्वरक्षण करण्यासाठी घातलाय कारण शेतात काम करणाऱ्या महिला सहसा शेतात काम करत असताना महिला पुरुष बसून किंवा वाकून काम करत असतात याच वेळेस सावज आपल्या पट्ट्यात येत असल्याने बिबट्या त्यांच्या मानेवर हल्ला करीत असल्याचे आजपर्यंतच्या हल्ल्यात दिसून आले आहे.

बिबट्या प्रामुख्याने मानेवरती हल्ला करतो हेच ओळखून महिलांनी आणि शेतकरी लहान मुले यांच्याकरीता टोकदार खिळे असलेला पट्टा जर गळ्यात असेल तर आपलं संरक्षण होऊ शकतं ही कल्पना डोक्यात घेऊन महिलांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

डोळ्यांसमोर आम्ही बिबट्याला कुत्र्यावर हल्ला करताना पाहिले. त्यावेळी कुत्र्याने गळ्यात खिळे असणारा पट्टा घातला असल्याने तो वाचला. हेच ओळखून आम्ही संरक्षणासाठी हा पट्टा घातला ज्यामुळे बिबट्याला आमच्या मानेवर हल्ला करता येणार नाही आणि आमचे संरक्षण होईल, असे पिंपरखेड येथील शेतकरी महिला सुनिता ढोमे यांनी सांगितले.

Comments are closed.