दहशतवादी मॉड्यूल उघड

गुजरातमध्ये आयसिसशी संबंधित तीन दहशतवाद्यांना

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरात एटीएसने दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करत मोठे यश मिळवले आहे. गुजरात एटीएस आणि केंद्रीय एजन्सींनी संयुक्तपणे आयसिसशी संबंधित दोन वेगवेगळ्या मॉड्यूलमधील तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे तीन दहशतवादी गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळ सुरक्षा देखरेखीखाली होते. आता शस्त्रास्त्रांची देवाण-घेवाण करण्यासाठी राज्यात आले असता ते एटीएसच्या जाळ्यात सापडले. त्यांच्या अटकेमुळे एक मोठा दहशतवादी कट उधळला गेला आहे. त्यांचे लक्ष्य अहमदाबाद, लखनौ आणि दिल्लीसारखी प्रमुख शहरे होती.

गुजरात एटीएस आणि केंद्रीय एजन्सींच्या व्यापक रणनीतीमुळे एक मोठा दहशतवादी धोका यशस्वीरित्या टाळला आहे. संयुक्त कारवाईत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा देखरेखीखाली ठेवून सतत माग काढला जात होता. संशयितांच्या हालचाली आणि योजनांबद्दल एजन्सींना पूर्व माहिती मिळाल्यामुळे ते राज्यात प्रवेश करत असताना त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे दहशतवादी शस्त्रास्त्रांची देवाण-घेवाण करण्यासाठी राज्यात आले होते. त्यांच्या अटकेनंतर गुजरात एटीएसने त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केली.

दोन वेगवेगळ्या मॉड्यूलशी संबंध

अटक करण्यात आलेले तिघेही आरोपी आयसिस नेटवर्कशी संबंधित दोन वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये सक्रियपणे सहभागी होते, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. ह्या कारवाईमुळे दोन वेगवेगळ्या मॉड्यूलशी संबंधित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेमुळे देशात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळला गेल्याचा एटीएसचा दावा आहे. या दहशतवाद्यांनी गुजरातमधून इतर राज्यांमध्ये शस्त्रs वाहतूक करण्याची योजना आखली होती. या गुप्त कारवाईद्वारे गुजरात एटीएसला मोठे यश मिळाले आहे.

आयएसकेपी मॉड्यूलचाही सहभाग

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये चीनमधून एमबीबीएस पदवी घेतलेला 35 वर्षीय डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यद याचा समावेश आहे. संबंधित डॉक्टर ‘आयएसकेपी’शी (इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत) जोडलेल्या मॉड्यूलचा भाग होता. तो ‘आयएसकेपी’शी संबंधित परदेशातील दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. अहमदसह त्याचे दोन सहकारी, मोहम्मद सुहेल आणि आझाद सैफी यांनाही अटक करण्यात आली.

वर्षभर ठेवली पाळत

तिघाही दहशतवाद्यांवर एका वर्षापेक्षा जास्त काळ पाळत ठेवण्यात आली होती. त्यांच्या ठिकाणांचा सतत मागोवा घेतला जात होता. अखेरीस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्यवेळी रंगेहाथ कारवाई करण्यात आली. हैदराबादचा रहिवासी असलेल्या 35 वर्षीय अहमद मोहिउद्दीनबद्दल अनेक महिन्यांपासून माहिती मिळाली होती. त्याचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आधारे, एटीएस त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते, असे गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले.

अहमदाबाद, लखनौ, दिल्लीमध्ये रेकी

एटीएसच्या मते अटक करण्यात आलेले तिघेही संशयित अहमदाबाद, लखनौ आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते. हे मॉड्यूल अत्यंत कट्टरपंथी होते आणि त्यांनी अहमदाबाद, लखनौ आणि दिल्लीची ग्राउंड रेकी केली होती. त्यांनी मोठ्या हल्ल्यासाठी ब्लूप्रिंट तयार करण्याची योजना आखली होती, असे एटीएसच्या तपासात दिसून आले होते.

धोकादायक ‘रायजिन’ द्रव बनवण्याची तयारी

एटीएसच्या मते, हे तिघे दहशतवादी ‘रायजिन’ नावाचे अत्यंत विषारी द्रव तयार करत होते. हा द्रव पदार्थ सायनाइडपेक्षा जास्त प्राणघातक आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. या द्रवाचा वापर या मॉड्यूलने कसा केला याचा तपास सुरू आहे.

राजस्थानमधून मागवली शस्त्रे

चौकशीदरम्यान अहमदने अनेक बाबी उघड केल्या आहेत. जप्त करण्यात आलेली शस्त्रास्त्रे राजस्थानच्या हनुमानगड येथून मागवण्यात आल्याचे त्याने सांगितले. ही शस्त्रास्त्रे तो गुजरातमध्ये पुरवण्यासाठी आला होता. या शस्त्रास्त्रांची डिलिव्हरी पूर्ण केल्यानंतर तो हैदराबादला परतणार होता. पुरवठा नेटवर्कमध्ये शस्त्रास्त्रे कोणत्या मार्गाने आणण्यात आली आणि त्यात अन्य कोण-कोण सहभागी होते याचा तपास एटीएस अधिकारी करत आहेत.

Comments are closed.