Team India : विजयी सुरुवातीनंतर पराभवाचा चौकार, कार्तिकच्या टीमची फ्लॉप कामगिरी

हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेची रंगत पहिल्याच दिवशी चांगली वाढली होती. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 6 षटकांच्या हाय- व्होलटेज सामन्यात पराभूत करत मोहिमेची अति दमदार सुरुवात केली होती. परंतु ही कामगिरी टिकली नाही. पुढील काही तासांतच टीम इंडियाचा खेळ गडगडला.

पाकिस्तानने मात्र सुरुवातीच्या धक्क्यानंतर जोरदार पुनरागमन केलं. शेवटच्या सामन्यात त्यांनी यजमान कुवेतला 43 धावांनी हरवत स्पर्धेची विजेतेपद ट्रॉफी पटकावली. त्याचवेळी भारतीय संघाचा प्रवास निराशाजनक ठरला. भारताला पहिल्या विजयाच्या नंतर सलग चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला आणि संपूर्ण मोहिमेतून ते लवकर बाहेर फेकले गेले. तेही बहुतेक सामने तुलनेने कमी अनुभवी संघांकडून.

ही स्पर्धा 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात आली. 12 संघांमध्ये तब्बल 29 सामने पार पडले. भारताच्या प्रभावी सुरुवातीनंतर समर्थकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, पण 8 नोव्हेंबरचा दिवस टीम इंडियासाठी कडू ठरला. एका दिवसात भारताला तीन पराभव झेलावे लागले. त्यामुळे शेवटच्या सामन्यात सन्मान राखण्याची संधी होती, पण तीही हुकली.

श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना भारताला फार महागात पडला. श्रीलंकेने 6 षटकांत एकही विकेट न गमावता तब्बल 138 धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज 3 विकेट्स गमावून केवळ 90 धावांपर्यंतच मजल मारू शकले.

त्याआधी कुवेतने भारतावर 27 धावांनी विजय मिळवला. भारताला 107 धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण पूर्ण 6 ओव्हरही खेळत न येता संघ 79 रन्सवर गुडघे टेकला. यूएईविरुद्ध 108 चं आव्हान बचावण्यात गोलंदाज अयशस्वी ठरले आणि सामना 1 चेंडू शिल्लक असताना चार विकेट्सने गमवावा लागला.

नेपाळने तर कमालीचा धक्का दिला. सलामी जोडीने नाबाद 137 धावांची भागीदारी करत आव्हान पर्वताएवढं केलं. त्याला उत्तर देताना भारताचा डाव 3 षटकांत 45 वर कोसळला आणि नेपाळने 92 धावांनी सामना जिंकला.

शेवटी, पाकिस्तानने अंतिम लढतीत कुवेतवर दबदबा राखत 135 धावा उभारल्या आणि कुवेतला 92 धावांवर थांबवत 43 धावांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

Comments are closed.