मेघालयाच्या आकाशचे षटकार स्फोट, सलग आठ षटकारांचा अन् 11 चेंडूंत अर्धशतकाचा पराक्रम
सुरतच्या मैदानावर रविवारी रणजी ट्रॉफीच्या प्लेट ग्रुप सामन्यात मेघालयाच्या आकाश चौधरीने गगनचुंबी सलग आठ षटकारांचे स्फोट करत नवा पराक्रम केला. त्याने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवत मेघालयाच्या संभाव्य विजयाला संस्मरणीय केले.
मेघालयाने अर्पित भटेवरा (207), किशन लिंगडोह (119) आणि राहुल दलाल (144) यांच्या शतकाच्या जोरावर धावांचा डोंगर उभारला होता. आज दुसऱया दिवशी 6 बाद 576 अशी जोरदार मजल मारली असताना क्रमांक आठवर हा गोलंदाज आला. हो, बरोबर वाचलंत, गोलंदाज! – असा फलंदाजीला उतरला की सुरतचे आकाश अक्षरशः षटकारांनी दणाणून गेले. पहिल्या दोन चेंडूंवर दोन धावा घेऊन तो शांत होता, पण नंतर जे घडलं ते ‘क्रिकेट इतिहासात’ ज्वालामुखीसारखं फुटलं. डावखुरा फिरकीवीर लिमार दाबीच्या षटकात त्याने तब्बल सहा षटकार ठोकले. प्रत्येक फटका म्हणजे जणू मैदानाच्या बाहेरून परत येणारा उल्का वर्षाव. आणि त्या एका षटकाने चौधरीने थेट त्या ‘आकाशीय क्लब’मध्ये प्रवेश केला जिथे आतापर्यंत फक्त दोन देव होते, सर गॅरी सोबर्स आणि रवी शास्त्राr.
पण आकाश तेथे थांबला नाही. पुढच्या षटकात टी.एन.आर. मोहितला दोन सलग षटकार मारून त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. तेसुद्धा अवघ्या 11 चेंडूंत.
इतिहासात असे वेगवान अर्धशतक कोणी पाहिले नव्हते. 2012 मध्ये लिस्टरशायरचा वेन व्हाइटने 12 चेंडूंवर अर्धशतक साकारले होते. पण चौधरीने एक चेंडू कमी घेतला आणि तो विक्रम वाऱयासारखा उडवून दिला.
वेळेच्या हिशेबाने पाहिलं तर ही अर्धशतकी झळाळी फक्त 9 मिनिटांत पूर्ण झाली. म्हणजे जणू चहाचा कप संपेपर्यंत माणूस इतिहास बनवून बसला. यापेक्षा जलद अर्धशतकाचा विक्रम फक्त क्लाईव्ह इनमनच्या नावावर आहे. 1965 मध्ये 8 मिनिटांत 13 चेंडूंवर त्याने धावांची पन्नाशी साकारली होती. चौधरी अखेर 14 चेंडूंवर 50 नाबाद राहिला. मेघालयने त्यानंतर 628 धावा करत डाव घोषित केला.
प्रत्युत्तरात अरुणाचल 73 धावांवर कोसळले आणि चौधरीने चेंडू हातात घेताच दोन विकेट टिपत पुन्हा चमक दाखवली. उद्या ते 400 धावा आणि डावाच्या फरकाने जिंकणार हेसुद्धा निश्चित आहे.
25 वर्षांचा हा वेगवान गोलंदाज आतापर्यंत त्याने 30 पेक्षा जास्त पहिल्या श्रेणीचे सामने खेळले आहेत. 503 धावा, दोन अर्धशतके, 87 विकेट. म्हणजे संख्याशास्त्रात तो सरासरी खेळाडू. पण रविवारी तो आकडय़ांच्या पलीकडे गेला. त्याने दाखवून दिलं की, क्रिकेट म्हणजे आकडय़ांचा खेळ नाही, ती धाडसाची कथा आहे.
Comments are closed.