माझ्या जीवाला धोका आहे, माझी हत्या होऊ शकते: तेज प्रताप

वृत्तसंस्था/ पाटणा

राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आणि जनशक्ती जनता दलाचे संस्थापक तेजप्रताप यांनी माझ्या जीवाला धोका असल्यानेच सुरक्षा वाढविण्यात आली असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने तेजप्रताप यांना वाय श्रेणीची सुरक्षा पुरविली आहे. लोक माझी हत्याही घडवून आणू शकतात, केंद्राने माझ्या मागण्या ऐकून घेत सुरक्षा वाढविली असल्याचे तेजप्रताप यांनी सांगितले आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीआरपीएफची सुरक्षा टीम तेजप्रताप यांना सुरक्षा पुरविणार आहे. तेजप्रताप यांना ही सुरक्षा व्हीआयपी प्रोटेक्शन लिस्ट अंतर्गत देण्यात आली आहे. या प्रकारच्या सुरक्षेत 11 कमांडो तैनात केले जातात. यातील 5 निवासस्थानी आणि आसपास राहतात. तर 6 कमांडो तीन शिफ्टमध्ये सुरक्षेत तैनात राहतात. तेजप्रताप यांनी यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील स्वत:च्या जीवाला धोका असल्याचे म्हणत सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. माझे शत्रू सर्वचठिकाणी आहेत, यातील 4-5 जण माझे खासगी जीवन उद्ध्वस्त करू पाहत असल्याचा दावा तेजप्रताप यांन केला होता.

कुटुंबातून बाहेर काढले

लालूप्रसादांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यांना चालू वर्षीच त्यांच्या पित्याने पक्ष आणि परिवारातून बेदखल केले होते. तेजप्रताप यांचे अनुष्का यादवसोबतचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लालूप्रसादांनी हे पाऊल उचलले होते. पक्ष आणि परिवारापासून वेगळे झाल्यावर तेजप्रताप यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन करत निवडणुकीत भाग घेतला आहे.

Comments are closed.