हा मरेल, रडेल, मार खाईल, पण बॅट नाही देणार; युवराज सिंगचा अभिषेक शर्माबाबत दिलखुलास खुलासा
हिंदुस्थानच्या क्रिकेटमधला नवा तडफदार चेहरा म्हणजे अभिषेक शर्मा! पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवल्यानंतर सगळीकडे चर्चा होती त्याच्या चौकार-षटकारांची. मालिकेत त्याने 163 धावा करून ‘प्लेअर ऑफ द सीरिज’चा किताब पटकावला. पण या मालिकेनंतर सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला ज्यात त्याचा मेंटॉर आणि माजी अष्टपैलू युवराज सिंगने तो मरेल, मार खाईल ,पण आपली बॅट देणार नाही, असं त्याचं एक भन्नाट गुपित उघड केलं आहे.
टी-20 मालिकेतील अभिषेकच्या सुस्साट कामगिरीनंतर युवराज हसत हसत म्हणाला, अभिषेककडून काहीही घ्या, पण त्याची बॅट कधी मागू नका. हा मरेल, रडेल, मार खाईल, पण बॅट नाही देणार. दहा बॅट असतील तरी तो हेच म्हणेल, भाई, माझ्याकडे फक्त दोनच आहेत! युवराज पुढे म्हणाला, हा माझ्याकडून कितीतरी बॅट घेऊन गेला, पण स्वतःची एकही बॅट दिली नाही. मला वाटतं, त्याच्यासाठी बॅट म्हणजे पवित्र वस्तू आहे. कदाचित त्या बॅटमध्येच त्याचा आत्मविश्वास दडलेला आहे.
युवराजने आजही आपल्या शिष्यावर काwतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला, अभिषेकमध्ये त्याला स्वतःच्या तरुणपणाची झलक दिसते. हा मुलगा मला माझ्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण करून देतो. आत्मविश्वास, बेधडकपणा आणि बॅटिंगमध्ये तीच हिंमत! आज तो जो खेळ दाखवत आहे, ती फक्त सुरुवात आहे. मला खात्री आहे की येणाऱया काळात हा हिंदुस्थानचा मॅचविनर असेल.
युवराजची ही खात्री व्यर्थ नाही. अभिषेकने या मालिकेत केवळ धावा केल्या नाहीत, तर इतिहासही रचला. तो बनला सर्वात वेगवान 1000 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारा हिंदुस्थानी फलंदाज. फक्त 528 चेंडूंत त्याने हा टप्पा पार केला आणि सूर्यपुमार यादवचा (573 चेंडू) विक्रम मोडला. ही आकडेवारी त्याच्या आक्रमक शैलीचा पुरावा ठरली.
युवराज म्हणाला, ‘जेव्हा मी त्याला प्रशिक्षण देतो तेव्हा त्याच्यात एक ज्वाला दिसते. बॅट त्याच्यासाठी केवळ साधन नाही. ती त्याची ओळख आहे. त्यामुळे मी त्याला चिडवतो, अरे, कधी तरी एक बॅट मला पण ठेव!
Comments are closed.