पुरुष शेफची वाढती लोकप्रियता; फूड इंडस्ट्रीत महिलांपेक्षा पुरुष का दिसतात पुढे?

आजच्या काळात फूड इंडस्ट्री ही केवळ चव आणि सादरीकरणापुरती मर्यादित नाही, तर ती एक संपूर्ण करिअर फील्ड बनली आहे. मोठ्या हॉटेल्सपासून ते आंतरराष्ट्रीय फूड फेस्टिव्हलपर्यंत, जिथे पाहावं तिथे पुरुष शेफ्सचे नाव झळकतंय. पण प्रश्न असा निर्माण होतो की, महिलांच्या स्वयंपाकातील हातचं कौशल्य जगभर मान्य असताना, फूड इंडस्ट्रीत पुरुष शेफ्सना एवढं प्राधान्य का मिळतंय? (why male chefs more popular than female in food industry)

‘Only Manini’ ला दिलेल्या खास मुलाखतीत सेलिब्रिटी शेफ तुषार देशमुख यांनी सांगितलं की, आजही आपल्या समाजात महिलांना हॉटेल इंडस्ट्रीत काम करताना अनेक मर्यादा पाळाव्या लागतात. वेळेचं बंधन, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सुरक्षिततेचे प्रश्न या सगळ्या गोष्टींमुळे अनेक महिला शेफ्सना त्यांचं करिअर मर्यादित ठेवावं लागतं. “महिलांमध्ये गुण, संवेदना आणि स्वयंपाकातील भावनिक नातं असतं, पण इंडस्ट्रीत टिकण्यासाठी सातत्य आणि वेळ देणं आवश्यक असतं, आणि तिथेच पुरुष शेफ्स जरा पुढे जातात,” असं देशमुख म्हणाले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये प्रत्येक पदार्थाचं मोजमाप, प्रमाण, सादरीकरण आणि चव एकसारखी राहणं गरजेचं असतं. हॉटेल्समध्ये जेव्हा एखादा पदार्थ सर्व्ह केला जातो, तेव्हा तो प्रथम हेड शेफ चाखतो, प्रमाण योग्य आहे का हे तपासतो. त्यामुळे त्या पदार्थाला स्टॅंडर्डाइज्ड चव मिळते. यासाठी मेहनत, अभ्यास आणि अनुभव आवश्यक असतो. “पुरुष शेफ्स या गोष्टींकडे अधिक लक्ष देतात ते सतत प्रयोग करतात, ट्रेंड्स समजून घेतात, आणि नवनवीन फूड स्टाइल्स आणतात,” असं त्यांनी सांगितलं.

तुषार देशमुख पुढे म्हणाले, “महिलांच्या हातची चव भावनिक असते आई, आजी किंवा बायको स्वयंपाक करताना घरचं प्रेम त्या पदार्थात मिसळतं. पण हॉटेलमध्ये ती भावना नव्हे, तर व्यावसायिक अचूकता महत्त्वाची ठरते. म्हणूनच पुरुष शेफ्स आज जास्त प्रमाणात दिसतात.” मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “महिलांकडे टॅलेंट कमी नाही, पण त्यांच्यासाठी वातावरण, वेळ आणि सपोर्ट आवश्यक आहे. आजही काही महिला या सगळ्या बंधनांना तोडून पुढे येत आहेत, आणि त्या दिवस दूर नाहीत जेव्हा महिला शेफ्स फूड इंडस्ट्रीत आघाडीवर असतील.”

फूड इंडस्ट्रीमध्ये आज जगभरात महाराष्ट्रातील पदार्थांनाही मोठी ओळख मिळत आहे. स्थानिक चवीपासून ते आंतरराष्ट्रीय फ्यूजन डिशपर्यंत, भारतीय शेफ्स जगभर नाव कमावत आहेत. या सगळ्यात महिला आणि पुरुष दोघांचं योगदान महत्त्वाचं आहे. पण समाजातल्या काही प्रथांमुळे अजूनही पुरुष शेफ्सची संख्या आणि मागणी थोडी जास्त दिसते.

Comments are closed.