दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट धक्कादायक; आदित्य ठाकरे यांच्याकडून खेद व्यक्त

नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हा स्फोट झाला. स्फोटानंतर तपास यंत्रणांनी तातडीने तापसाला सुरुवात केली असून हा दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट ही खरोखरच धक्कादायक घटना आहे. मी जखमींसाठी आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, तसेच या भयानक स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी खेद व्यक्त करतो. तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या दुखात आपण सहभागी आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेची माहिती घेतली आहे. तसेच अमित शहा यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्याचबरोबर त्यांनी घटनास्थळालाही भेट दिली. या घटनेचा सर्व पैलूंनी तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Comments are closed.