मुंबईत हाय अलर्ट, रेल्वे स्थानक, हॉटेलांमध्ये कसून तपासणी! पोलिसांसह बॉम्ब शोधक-नाशक पथके तैनात, वर्दळीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला

दिल्लीतील स्फोटानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रेल्वे स्थानके, सार्वजनिक ठिकाणी, कुलाबा, नरीमन हाऊस, हॉटेल ताज अशा महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथके तैनात करण्यात आली आहेत. सिद्धिविनायक मंदिर परिसरातही बंदोबस्त वाढवण्यात आली आहे. शिवाय मुंबई पोलिस. आरपीएफ आणि श्वान पथकांसह संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह सर्वच रेल्वेस्थानकांवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. स्थानकावर येणाऱ्या सर्व संशयितांचीही तपासणी करण्यात येत आहे. पोलीस अलर्ट आहेतच, मात्र नागरिकांनीही जागरूक रहावे, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांशी संपर्क करावा असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या वावरणार्या व्यक्तींसह सर्व संशयित वस्तू, सामानांची कसून झाडाझडती घेण्यात येत आहे. भुयारी मेट्रो मार्गिकाही अलर्ट मोडवर आहे.  मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांबरोबरच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या या गर्दीचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वे आणि मेट्रो स्थानकांच्या सुरक्षेत वाढ

मुंबईतील सर्व मेट्रो मार्गिकांवरील स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांवर विशेष ’वॉच’ ठेवण्यात येत आहे. मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, दादर, मुंबई सेंट्रल, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, घाटकोपर, कुर्ला तसेच ठाणे अशा प्रमुख स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. जीआरपी आणि आरपीएफच्या माध्यमातून सर्व प्रमुख आणि संवेदनशील स्थानकांच्या परिसरात कडक पहारा देण्यात आला आहे.

Comments are closed.