रामाचे नाव एकावन्न हजार वेळा लिहा.

अयोध्येतील राजर्षी दशरथ वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने एक नवा नियम केला आहे. महाविद्यालय आणि त्याचा परिसर येथे अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार महाविद्यालयात किंवा परिसरात अनुशासन भंग किंवा चूक करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना, तसेच कार्मचाऱ्यांना 51 हजार वेळा रामनाम लिहावे लागणार आहे. ही शिक्षा चुकीच्या तीव्रतेनुसार कमी-अधिक केली जाऊ शकणार आहे. कमीत कमी शित्रा 11 हजार वेळा रामनाम लिहिण्याची असू शकते. तर अधिक तीव्र चुकीसाठी ती 51 हजार रामनामांची असू शकेल. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्यजीत वर्मा यांनी ही माहिती दिली असून महाविद्यालयाचा हा नियम सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

नेहमी वर्गात अनुपस्थित राहणे, प्राध्यापकांची व्याख्याने चुकविणे, नोटस् काढण्यात कुचराई करणे, शैक्षणिक नियमावलीचे पालन न करणे, उपस्थिती नोंदविण्याच्या कामी घोटाळा करणे आदी चुकांसाठी ही शिक्षा दिली जात आहे. आतापर्यंत चार ते पाच ज्युनियर डॉक्टर्सना ही शिक्षा देण्यात आली आहे. मात्र, रामनाम लिहिण्याची ही शिक्षा केवळ हिंदू विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसेच हिंदू कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. अन्य धर्मियांच्या अशाच स्वरुपाच्या शिक्षेत परिवर्तन करण्यात आले आहे. जो ज्या धर्माचा असेल, त्याने त्याच्या धर्माच्या देवाचे नाव 11 हजार ते 51 हजारवेळा लिहायचे आहे, असेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

रामनाम लिहिण्याची ही शिक्षा विद्यार्थ्यांमध्ये अनुशासनाची भावना तर जागृत करेलच. पण त्याचबरोबर त्यांच्या मनातील क्रोध होऊन त्यांना सकारात्मक ऊर्जा ही या शिक्षेमुळे मिळेल, असे व्यवस्थापनाचे प्रतिपादन आहे. ही शिक्षा कार्यान्वित करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने विशेष लेखनपुस्तिकांची खरेदीही केली आहे. या शिक्षेला विद्यार्थी-विद्यार्थिनींनी किंवा कर्मचाऱ्यांनी विरोध केलेला नाही. काही दिवसांपूर्वीपासूनच हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. त्याचा सुपरिणाम दिसून येत आहे, असे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. अनुशासन भंगासाठी अशा प्रकारची शिक्षा देणारे हे भारतातील प्रथम महाविद्यालय असावे, अशीही चर्चा आहे. एकंदर, या शिक्षेची प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

Comments are closed.