बिहारमध्ये 122 जागांसाठी आज मतदान होत आहे
विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा : 1,302 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी मतमोजणी
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या म्हणजेच अंतिम टप्प्यातील प्रचार रविवारी संध्याकाळी संपल्यानंतर आता मंगळवारी मतदान होत आहे. 20 जिह्यांमधील 122 जागांसाठी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यात 1,302 उमेदवार निवडणूक लढवत असून त्यात अनेक हाय-प्रोफाईल मतदारसंघांचा समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या मतदारसंघांमध्ये त्यांची पूर्ण ताकद लावल्याने संपूर्ण देशाचे लक्ष बिहारकडे लागले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात किती मतदान होते आणि 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होणारा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे.
अंतिम टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी चोखपणे पूर्ण केली आहे. प्रशासकीय तयारीसोबतच सुरक्षा यंत्रणाही कडक करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी निवडणूक अधिकारी-कर्मचारी वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ईव्हीएमसह अन्य साहित्य घेऊन रवाना झाले. या टप्प्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. या टप्प्यात पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, शिवहार, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, भागलपूर, बांका, जमुई, नवादा, गया, औरंगाबाद, जहानाबाद, अरवल, कैमूर आणि रोहतास या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या टप्प्यात एकूण 1,302 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 1,165 पुरुष, 136 महिला आणि एक ट्रान्सजेंडर उमेदवाराचा समावेश आहे. या टप्प्यात 3.70 कोटीहून अधिक मतदार मतदान करण्यास पात्र असून त्यात 1.95 कोटी पुरुष आणि 1.74 कोटी महिलांचा समावेश आहे.
या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या सीमांचल प्रदेशात तसेच चंपारण्य पट्टा आणि मिथिला प्रदेशात मतदान होणार आहे. पहिला टप्पा नितीश कुमार आणि जितनराम मांझी यांच्या एनडीएच्या विश्वासार्हतेची परीक्षा होती. तर आता दुसऱ्या टप्प्यात भाजपची खरी परीक्षा मानली जाते. दुसरीकडे, महाआघाडीमध्ये राजद आणि काँग्रेस आपापली ताकद सिद्ध करतील, तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमला सीमांचलमध्ये आपले स्थान टिकवण्याचे आव्हान असेल. 2020 मध्ये ओवैसींनी या टप्प्यात काही जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
अनेक मंत्री, दिग्गज मैदानात
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने सुपौलमधून बिजेंद्र प्रसाद यादव, चकाईमधून सुमित कुमार सिंह, झांझरपूरमधून नितीश मिश्रा, अमरपूरमधून जयंत राज, छतापूरमधून नीरज कुमार सिंह बबलू, बेतियाहून रेणू देवी, धामदाहून लेशी सिंह, हरसिद्धीमधून कृष्णनंदन पासवान आणि चैनपूरमधून जामा खान यांचा समावेश आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश राम, कटिहारमधील कडवा मतदारसंघातून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते शकील अहमद खान आणि सीपीआय(एमएल) विधिमंडळ पक्षाचे नेते मेहबूब आलम हे महाआघाडीकडून निवडणूक लढवत आहेत.
पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात अंदाजे 65.08 टक्के मतदान झाले. यामध्ये समस्तीपूरमध्ये सर्वाधिक 71.74 टक्के मतदान झाले. राजधानी पाटणा येथे सर्वात कमी 59.02 टक्के मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातही विक्रमी मतदान अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केले. महिलांची मतदानाची टक्केवारी 69.04 टक्के होती, तर 61.56 टक्के पुरुष मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता.
दुसऱ्या टप्प्यातील आकडेवारी
विधानसभेच्या जागा : 122
एकूण उमेदवार : 1,302
पुरुष उमेदवार : 1,165
महिला उमेदवार : 136
ट्रान्सजेंडर उमेदवार : 1
एकूण मतदान केंद्रे : 45,399
मतदार संख्या : 3,70,13,556
पुरुष मतदार : 1,95,44,041
महिला मतदार : 1,74,68,572
नवीन मतदार : 5,28,954
Comments are closed.