घारापुरी बेटावर सापडल्या पुरातन वस्तू, पुरातत्व विभागाने सुरू केले उत्खनन इतिहासावर पडणार आणखी प्रकाश

लाखो पर्यटक व संशोधक, अभ्यासकांचे आकर्षण असलेल्या प्रसिद्ध घारापुरी बेटावर पुरातन वस्तू सापडल्या आहेत. दगडी तसेच धातूच्या या वस्तू असून पुरातत्व विभागाने शेतबंदर ते सीतागुंफा या दरम्यान उत्खनन सुरू केले आहे. अंदाजे 70 मजूर खोदकाम करीत असून चार ते सहा महिने ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. उत्खननानंतर आणखीही काही मौल्यवान व पुरातन दुर्मिळ वस्तू सापडतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घारापुरी बेटावर यापूर्वीही सम्राट चंद्रगुप्त आणि त्याचा नातू कुमार गुप्त यांच्या काळातील शिसे व तांब्याची नाणी सापडली होती. बेटावरील विविध ठिकाणी यापूर्वी करण्यात आलेल्या खोदकामामध्ये दळणकांडण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू सापडल्या होत्या. त्यात जाते, मडकी आदींचा समावेश आहे. त्याशिवाय भग्नावस्थेत असलले शिवलिंगदेखील अनेकदा सापडले. काही दिवसांपूर्वी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले होते. शेरबंदर गावातील स्मशानभूमी ते सीतागुंफा या एक हजार मीटर लांबीच्या परिसरात काही पुरातन वस्तू आढळून आल्या.
मोराबंदर येथील डोंगराच्या पायथ्याशी तसेच समुद्राला मिळणाऱ्या ओढे, नाल्यांच्या मध्ये सोने, चांदी व इतर धातूंच्या मुद्रा यापूर्वी सापडल्या आहेत.
ज्या भागात दुर्मिळ वस्तू सापडल्या तेथेच सर्वेक्षण करण्याचा निर्णय पुरातत्व विभागाने घेतला. आता तेथे खोदकाम करण्यास सुरुवात केली असून आणखी काही मौल्यवान साठा हाती लागण्याची शक्यता आहे.
घारापुरीच्या इतिहासावर लवकरच प्रकाश पडेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आजपासून या खोदकामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
अधिकारी, संशोधक, मजुरांची फौज
घारापुरी बेटावर रोज हे खोदकाम सुरू राहणार आहे. पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ. अभिजित आंबेकर, पुरातत्व संशोधक रवी राज, फाल्गुनी, रामटेके, प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, घारापुरीचे उपसरपंच बळीराम ठाकूर व 70 मजूर अशी मोठी फौज संशोधनाच्या प्रक्रियेत सहभागी झाली आहेत.

Comments are closed.