वाड्यातील क्रीडा संकुलाची दहा वर्षापासून रखडपट्टी, अतिक्रमणाचा विळखा; क्रीडा विभागाची उदासीनता

आदिवासी भागातील खेळाडू तरुण-तरुणींना सरावासाठी 16 एकर जागेवर दहा वर्षांपूर्वी क्रीडा संकुल मंजूर झाले. पण अजूनपर्यंत त्याची वीटही रचली गेलेली नाही. विजयपूर (कोने) येथे हे क्रीडा संकुल अभारले जाणार होते. क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे संकुलाच्या उभारणीला अजून मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात भरारी घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या खेळाडूंनी सराव करायचा तरी कुठे, असा प्रश्न पडला आहे.

वाडा हा आदिवासी बहुल तालुका असला तरी येथील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दल मोठे आकर्षण आहे. कबड्डी, खो-खो, क्रिकेट भालाफेक, ज्युडो-कराटे याचे प्रशिक्षण काही विद्यार्थी घेत आहेत. पण त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. वाड्यामधील खेळाडूंना विविध प्रकारचे क्रीडा प्रशिक्षण देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चुन भव्य क्रीडा संकुल उभारले जाणार होते. त्यासाठी जागाही आरक्षित करण्यात आली. पण प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये संतापाची भावना आहे.

अनुदानाची तरतूद तरी…
तालुकास्तरावर क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी अनुदानाची तरतूद आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रेक्षक गृहासाठी 67 लाख तसेच फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, धावपट्टी, अँर्थेलेटिक्स, बॅडमिंटन, कुस्ती, खो खो, कबड्डी मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स आदी खेळांसाठीदेखील अनुदानाची तरतूद आहे. गेल्या तीन चार वर्षांपूर्वी क्रीडा संकुलाला मंजुरी मिळाली असून संरक्षण भिंत व निवारा शेड यांचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहे. मनसेने क्रीडा संकुलासाठी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र ढिम्म प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे खेळाडूही संतप्त झाले आहेत.

Comments are closed.