आयोगाने मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना फटकारले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने फटकारले आहे. दंपा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या विधानांच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अहवालाचा आणि सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट (झेडपीएम) पक्षाचे अध्यक्ष ललियानसावता यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाचा आढावा घेतल्यानंतर आयोगाला पक्षाचा प्रतिसाद अस्वीकार्य वाटला. त्यानंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांना नोटीस पाठवली. तसेच निवडणूक आयोगाने झेडपीएम अध्यक्षांना पक्षाच्या सर्व स्टार प्रचारकांना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यास संवेदनशील करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही स्टार प्रचारकाने निवडणूक वातावरण बिघडू शकेल किंवा मतदारांच्या मनात निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल शंका निर्माण करू शकेल अशी विधाने करू नयेत असा इशाराही दिला आहे. मंत्र्यांसह सार्वजनिक पदांवर असलेल्यांनी त्यांच्या वक्तव्यांमध्ये सावधगिरी आणि संयम बाळगावा, असे आवाहनही आयोगाने केले आहे.

Comments are closed.