कल्याण, टिटवाळ्यात रहिवाशांचा आज ड्राय डे; 12 तास पाणीपुरवठा बंद

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून मोहाली जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी कल्याण-टिटवाळ्यातील काही भागात १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
उल्हास नदीकाठावरील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसर, कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसर, उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसर तसेच टिटवाळा ‘अ’ प्रभागातील मांडा, टिटवाळा, मोहने, आंबिवली, धाकटे शहाड, शहाड, बंदरपाडा आणि वडवली परिसरात पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशीही कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
तांत्रिक अडचणी दूर करणार
नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेकडून नियमितपणे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. त्यानुसार केडीएमसीतर्फे मोहिली जलशुद्धीकरणाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामादरम्यान जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच मशिनींमधील कचरादेखील संकलित करण्यात येणार आहे.

Comments are closed.