ड्रममध्ये लपून बसलेल्या बलात्काऱ्यावर झडप, वसईच्या कोर्टातून पळाला… वाडीत सापडला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी दानिश खान उर्फ जमीर (23) याला अटक करून पोलिसांनी त्याला आज वसई न्यायालयात हजर केले. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळाला. अर्ध्या तासानंतर वसईतील एका वाडीतून पोलिसांनी या नराधमाला शोधून काढले. ड्रममध्ये लपून बसलेल्या बलात्काऱ्यावर झडप घालून पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
शुक्रवारी नालासोपारा पूर्वेच्या धुमाळनगर परिसरात १२ वर्षांच्या मुलीवर नराधम दानिशने बलात्कार केला होता. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखा दोनच्या पथकाने ४८ तासांच्या आत आरोपीला नालासोपारा येथून अटक केली. आरोपीविरोधात यापूर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपीला अटक करून पुढील तपासासाठी पेल्हार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज दुपारी आरोपी दानिश खानला वसई न्यायालयात हजर करण्यात आले होते.

प्रसाधनगृहात जाण्याच्या बहाण्याने चकवा
दानिश खानला कोर्टात आणल्यानंतर प्रसाधनगृहात जाण्याचा बहाणा करून पोलिसांना चकवा देऊन तो पसार झाला. त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. त्याचा शोध सुरू करण्यात आला. वसई पंचायत समिती येथील एका वाडीत तो गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पोलिसांची पथके या वाडीत शिरली. तेथील एका घरात ड्रममध्ये तो लपला होता. पोलिसांनी ड्रममधून खेचून काढून त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात डांबले.

Comments are closed.