National Education Day 2025: राष्ट्रीय शिक्षण दिन विशेष, ११ नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो शिक्षण दिन?

दरवर्षी 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्याची परंपरा आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची आठवण करून देण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो.राष्ट्रीय शिक्षण दिनाची सुरुवात 11 नोव्हेंबर 2008 रोजी करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था या दिवशी विविध उपक्रम, निबंध स्पर्धा, व्याख्यानं आणि प्रदर्शनांद्वारे मौलाना आझाद यांच्या कार्याचा गौरव करतात. (national education day 2025 maulana abul kalam azad)

मौलाना आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रबळ नेते, तत्त्वज्ञ, आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांनी देशात सर्वांसाठी समान शिक्षण आणि दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय ठेवले. त्यांना आधुनिक भारताच्या शैक्षणिक धोरणाचा शिल्पकार म्हटले जाते.

शिक्षण क्षेत्रातील मौलाना आझाद यांचे योगदान
1920 मध्ये उत्तर प्रदेशातील अलीगड येथे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी मौलाना आझाद यांची फाउंडेशन कमिटीवर निवड झाली. त्यानंतर 1934 मध्ये विद्यापीठाचे नवे कॅम्पस दिल्लीमध्ये हलवण्यात आले, तेथे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आजही त्या कॅम्पसच्या प्रवेशद्वारावर त्यांचे नाव कोरलेले आहे.

स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी शिक्षण ग्रामीण आणि गरिबांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. सर्व मुलांना समान शिक्षण मिळावे, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण वाढावे यासाठी त्यांनी अनेक योजना राबवल्या. IIT आणि UGC सारख्या संस्थांच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते.

शिक्षणाचा प्रसार आणि समानतेचा विचार
मौलाना आझाद यांचे मत होते की शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नाही, तर समाजात समानता आणि प्रगती आणण्याचे प्रभावी साधन आहे. त्यांनी धर्मनिरपेक्ष आणि आधुनिक भारताच्या घडणीत शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवले. आजही त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन देशात शिक्षणाचा प्रसार आणि प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments are closed.