अर्शदीप सिंह अन् कुलदीपला प्लेइंग XI बाहेर का ठेवले जातेय?; गौतम गंभीरने अखेर कारण सांगितलं!

भारतीय संघातील दोन महत्त्वाचे गोलंदाज अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांच्यावर अलीकडेच निवड धोरणाबाबत बरंच बोललं जात आहे. अर्शदीप हा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला असून, त्याच्या डेथ ओव्हर्समधील अचूक चेंडूंची ख्याती जगभर पसरली आहे. दुसरीकडे, कुलदीप यादवच्या फिरकीने अनेक दिग्गज फलंदाज गोंधळलेले दिसले आहेत. तरीही गेल्या काही मालिकांमध्ये या दोन्ही गोलंदाजांना अंतिम अकरामध्ये संधी मिळालेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि माजी खेळाडूंकडून प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंटवर टीका होत आहे.

या सर्व चर्चांना उत्तर देताना गौतम गंभीरने अखेर मौन सोडले. बीसीसीआय टीव्हीशी बोलताना तो म्हणाला, “प्रशिक्षक म्हणून मी करू शकणाऱ्या सर्वात कठीण गोष्टींपैकी एक म्हणजे अंतिम अकरा निवडणं. आमच्या संघात इतकी प्रतिभा आहे की प्रत्येकजण प्लेइंग इलेव्हनमध्ये येण्यास पात्र आहे. पण वास्तव हे आहे की मैदानावर फक्त 11 खेळाडू उतरू शकतात. त्यामुळे प्रत्येक सामन्याची परिस्थिती, पिच, विरोधी संघाची रचना आणि आमची रणनीती यांचा विचार करून संघ निवडावा लागतो.”

गंभीर पुढे म्हणाला, “माझ्यासाठी संघातील वातावरण हे सर्वात महत्त्वाचं आहे. ड्रेसिंग रूम नेहमी सकारात्मक, प्रेरणादायी आणि एकमेकांचा आदर करणारा असावा. प्रशिक्षक म्हणून खेळाडूंशी माझं नातं प्रामाणिक असणं गरजेचं आहे. मी सरळ बोलतो, मनातलं सांगतो, कुणालाही चुकीची आशा देत नाही. खेळाडूंनाही हे आवडतं आणि ते समजून घेतात.”

त्याच्या मते संघात असणाऱ्या प्रत्येक खेळाडूची महत्त्वाची भूमिका असते, मग तो अंतिम अकरात असो किंवा बेंचवर. “कधी तरी कोणाला बसावं लागतं, तर कधी दुसऱ्याला संधी मिळते. पण दीर्घकालीन दृष्टीने प्रत्येकाचा सहभाग गरजेचा आहे,” असं गंभीरने स्पष्टपणे सांगितलं.

Comments are closed.