Delhi Car Blast – कोलकाता हाय अलर्टवर; हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका सामना होणार का नाही? वाचा…

दिल्लीमध्ये लाल किल्ला परिसरात सोमवारी (10-11-2025) कारचा स्फोट झाला. या स्फोटामद्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरे हाय अलर्टवर असून प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अशातच 14 नोव्हेंबरला कोलकाताच्या इडन गार्डन्सवर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
सामन्याच्या आयोजनासंदर्भात आणि सुरक्षेच्या दृष्टीकोणातून कोलकाता पोलिसांनी कंबर कसून तयारी केली आहे. इडन गार्डन्स परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की, दिल्लीमध्ये झालेला स्फोट लक्षात घेता, विशेष आणि अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. पोलिसांसोबत स्पेशल टास्क फोर्स (STF) देखील तैनात केले जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. पहिल्या कसोटीच्या पार्श्वभुमीवर क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) चे अधिकारी आणि पोलीस आयुक्त मनोज वर्मा यांच्यात आज बैठक होणार होती. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलिसांनी क्रिकेट स्टेडियम आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.
इडन गार्डन्स स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पश्चिम बंगाल विधानसभा, राजभवन, ऑल इंडिया रेडिओ आणि कोलकाता उच्च न्यायालयाच्या इमारती आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हा संपूर्ण परिसर महत्त्वपूर्ण आहे. सामन्याच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता. प्रत्येकाची किमान दोनवेळा मेटल स्कॅनरने तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच साध्या वेशातील पोलीस कर्मचारी स्टेडियमच्या आत आणि बाहेर तैनात असणार आहेत. त्याचबरोबर हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ राहत असलेल्या हॉटेलमधील सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आली आहे.

Comments are closed.