स्थानिक पातळीवरील निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपची केंद्र व राज्यातील मंत्र्यांची फौज

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने आज आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. स्थानिक पातळीवरील या निवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपने थेट केंद्र व राज्यातील मंत्र्यांना उतरवले आहे.

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली.

या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा समावेश आहे. याशिवाय नारायण राणे, अशोक चव्हाण तसेच अल्पसंख्याक समाजातील इद्रिस मुलतानी यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचाही समावेश आहे.

मुंबई भाजपमध्ये सरचिटणीस नियुक्ती

आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई भाजपने ब संघटनात्मक नियुक्त्या घोषित केल्या. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आज पक्षाच्या सरचिटणीसपदी राजेश शिरवडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळकर यांची नियुक्ती घोषित केली. या नेमणुकांमुळे मुंबई भाजपची कार्यकारिणी लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.