पुण्यात डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाचा खून

आर्थिक वादातून मित्रांनी डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाचा खून केला. चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील अलंकापुरम रस्ता येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

नितीन गिलबिले (37) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अमित पठारे, विक्रांत ठाकूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत. नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते. त्यावेळी नितीन यांचा मित्र असलेला अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फॉर्च्युनर कार घेऊन तिथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवले. त्यानंतर गिलबिले यांच्या अलंकापुरम रस्त्यावरील हॉटेलच्या दिशेने ते गेले. आरोपींनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडली. यात नितीन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

नितीन गिलबिले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. नितीन यांनी काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर हॉटेल सुरू केले होते. तसेच, व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाडेतत्त्वावरही दिले. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसायदेखील ते करत होते.

Comments are closed.