विठूरायाला उबदार कानपट्टी; रखुमाईला शाल, थंडीमुळे पहाटेचा पोशाख बदलला

राज्यात सर्वदूर थंडीची सुरुवात झाली. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, कानटोपी, शाल खरेदी केली जात आहे. अशातच लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या श्री विठूरायाचा पहाटेचा पोशाखदेखील बदलला आहे. श्री विठूरायाला सुतीची कानपट्टी, तर रखुमाईला उबदार शाल पांघरली जाते. कार्तिक वद्य पंचमी ते माघ शुद्ध पंचमी या काळात पहाटे काकड आरती झाल्यावर सकाळी ८.३० पर्यंत हा पोशाख असतो, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक राजाभाऊ राऊत यांनी दिलीय.

देवाला प्रत्येक ऋतूप्रमाणे पोशाख आणि आहार दिला जातो. यात आध्यात्मिकतेसोबत विज्ञानाची जोड दिसून येते. हिवाळ्यात विठूराया आणि रखुमाईला सकाळी उबदार पोशाख असतो. पहाटे काकड आरती झाल्यानंतर विठूरायाला कानपट्टी बांधली जाते. डोक्यावरून दोन्ही कान झाकले जातात. अंगावर शाल पांघरली जाते. अशा पोशाखात राजस सुकुमार असे विठूरायाचे रूप दिसून येते. तर, रखुमाईला दोन्ही खांद्यांवरून उबदार शाल पांघरली जाते. वारकरी संप्रदायाच्या शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार देवाचे पोशाख आणि आहार याची परंपरा आजही जोपासली जात आहे. आपण इंग्रजी महिन्यानुसार हिवाळा, उन्हाळा, पावसाळा हे ऋतू पाळतो. मात्र, मराठी महिन्यानुसार देवाचे ऋतुमान आणि त्यानुसार आहार आणि पोशाखाची परंपरा आहे.

त्याप्रमाणे कार्तिक वद्य पंचमीपासून पहाटे देवाला थंडीपासून बचाव करणारे पोशाख परिधान केले जातात. माघ शुद्ध पंचमीपर्यंत हिवाळा ऋतू मानला जातो. या काळात थंडी असते, त्यामुळे देवाला पहाटे उबदार पोशाख परिधान केला जातो. माघ पंचमीपासून पुढे उन्हाळा सुरू होतो. त्यावेळी देवाला पांढरा पोशाख, तर पुढे चंदनऊटी लावून उन्हाची दाहकता कमी केली जाते. पोशाखाप्रमाणे देवाचा आहारदेखील ज्या-त्या ऋतूप्रमाणे दिला जातो. असे असले तरी पहाटेच्या पोशाखात देवाचे रूप अधिकच खुलून दिसते.

Comments are closed.