पक्ष चिन्हाच्या वादावर २१ जानेवारीला सुनावणी
सर्वोच्च न्यायालय अंतिम सुनावणी करण्याच्या पवित्र्यात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांनी सादर केलेल्या पक्षांची चिन्हे आणि नावे यांच्या वादांवर सर्वोच्च न्यायालय 21 जानेवारीला सुनावणी करणार आहे. भावी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्या. जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर बुधवारी हे प्रकरण आले होते. तथापि, त्यावर सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने 21 जानेवारीपासून अंतिम सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत तरी ही सुनावणी होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
प्रथम हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सुनावणी करून एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा, तसेच अजित पवार यांचाच राष्ट्रवादी पक्ष खरा असल्याचा निर्णय काही काळापूर्वी दिला होता. त्यामुळे या पक्षांची मूळ चिन्हे आणि नावे अनुक्रमे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना देण्यात आली होती. या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या दोन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केलेल्या आहेत. मात्र, 2024 ची लोकसभा निवडणूक आणि त्याच वर्षी नंतर झालेली विधानसभा निवडणूक ही चारही पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसारच लढले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत घ्या, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यानुसार आयोगाने सज्जताही केली आहे. तसेच नगर पालिकांच्या आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुका होण्याआधी चिन्ह आणि नाव यांच्या वादासंबंधीचा अंतिम निर्णय होणार नाही, हे बुधवारच्या आदेशाने स्पष्ट झाले.
झाला नाही युक्तिवाद
बुधवारी हे प्रकरण खंडपीठासमोर आले होते. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे वकील न्यायालयात उपस्थित होते. तथापि, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. 21 जानेवारीला अन्य कोणतेही काम ठेवू नका, असाही आदेश न्यायालयाने आपल्या कर्मचारीवर्गाला दिल्याने या दिवसापासून अंतिम सुनावणीला प्रारंभ होणार हे स्पष्ट झाले आहे. निर्णयासंबंधी उत्सुकता आहे.
Comments are closed.