युनूसचे भारताशी असलेले वैर आत्मघातकी आहे

शेख हसीना यांचे वक्तव्य : बांगलादेशात परतण्यासाठी ठेवली अट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांगलादेशात लोकशाही बहाल होणे हीच माझी मायदेशी परतण्यासाठीची पहिली अट आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे भारताबद्दलचे शत्रुत्व मूर्खतापूर्ण आणि आत्मघाती आहे. भारत-बांगलादेशचे संबंध अत्यंत दृढ असून युनूस यांच्या मूर्खतेच्या कार्यकाळानंतरही हे मजबूत राहू शकतात असे वक्तव्य बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केले आहे.

भारत नेहमीच बांगलादेशचा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय भागीदार राहिला आहे. भारतासोबत संबंध बिघडविणे मोहम्मद युनूस यांचा मूर्खपणा आहे आणि हे कूटनीतिक स्वरुपात आत्मघाती पाऊल आहे. मोहम्मद युनूस हे कट्टरवाद्यांच्या समर्थनावर निर्भर आहेत. बांगलादेशातील वर्तमान अंतरिम सरकार देशवासीय आणि खासकरून बांगलादेशच्या महिलांचे प्रतिनिधित्व करत नाही असे उद्गार शेख हसीना यांना एका मुलाखतीत काढले आहेत.

भारत सरकारचे आभार

भारतात आश्रय दिल्याप्रकरणी मी येथील सरकारचे आभार मानते. भारत आणि भारतीयांच्या पाहुणचाराची मी आभारी आहे. बांगलादेशात लोकशाही परतणे आवश्यक आहे. अंतरिम सरकारला अवामी लीगवरील बंदी हटवावी लागेल आणि निवडणूक निष्पक्ष, समावेशक आणि मुक्त पद्धतीने होईल हे सुनिश्चित करावे लागेल असे शेख हसीना म्हणाल्या.

कट्टरवाद्यांचा गड

मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशात हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडावे लागले होते आणि त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता. यानंतर मोहम्मद युनूस हे बांगलादेशात अंतरिम सरकारचे नेतृत्व करत आहेत. परंतु युनूस यांच्या धोरणांमुळे भारत आणि बांगलादेशच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. युनूस हे बांगलादेशातील कट्टरवाद्यांचे समर्थन करत असून पाकिस्तानसोबत जवळीक साधन आहेत.

पाश्चिमात्यांकडून युनूस यांना समर्थन

मोहम्मद युनूस यांना काही पाश्चिमात्य नेत्यांकडून समर्थन मिळाले होते. परंतु मोहम्मद युनूस यांनी कट्टरवाद्यांची साथ घेत अल्पसंख्याकांसोबत भेदभाव चालवला आहे. यामुळे पाश्चिमात्य नेते आता युनूस यांना दिलेले पाठबळ कायम ठेवण्याची शक्यता नसल्याचा दावा शेख हसीना यांनी केला आहे.

Comments are closed.