Women Health: महिलांच्या सेक्स लाईफवर ‘या’ गोष्टींमुळे होतात नकारात्मक परिणाम

सेक्स लाईफचे महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असतात. लैंगिक संबंध हे केवळ नात्यासाठी महत्त्वाचे नसतात तर त्यामुळे मेंदूत ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन नावाचे हॅपी हार्मोन रिलीज होत असतात. ज्यामुळे ताण कमी होतो, मूड चांगला राहतो. शिवाय हार्मोनल संतुलन चांगलं राहिल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. मात्र काही गोष्टींचा महिलांच्या लैंगिक जीवनावर नकारत्मक परिणाम होतो. परिणामी त्यांच्या आरोग्यासाठीही ते घातक ठरू शकतं.

ताण आणि चिंता
मानसिक ताण, कामाचा दबाव, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींमुळे महिलांना लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा राहत नाही. शिवाय चिंतेमुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे महिलांच्या मानसिक आरोग्यासह लैंगिक जीवनावर परिणाम होतो.

हार्मोनल असंतुलन
महिलांच्या शरीरातील हार्मोनल बदलांचा त्यांच्या लैंगिक जीवनावर थेट परिणाम होत असतो. थायरॉईड, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने हार्मोन्सच्या पातळीत बदल होतात, ज्यामुळे योनीत कोरडेपणा, वेदना किंवा जळजळ होण्याची शक्यता असते. यामुळे शारीरिक संबंध ठेवण्यास अडचणी येतात.

भावनिक सुरक्षेचा अभाव
बऱ्याचदा जोडप्यांमधील भावनिक दरी ही महिलांच्या जीवनात नकारात्मक परिणामांना कारणीभूत ठरते. सतत संताप, राग, चिडचिड या गोष्टींचा नात्यावर आणि पर्यायाने शारीरिक संबंधांवर परिणाम होतो. जर जोडप्यात संवाद, भावनिक जवळीक नसेल तर महिलांच्या लैंगिक जीवन बिघडते.

आजार
मधुमेह किंवा हृदयरोग यासारख्या गंभीर आरोग्य समस्या आणि काही औषधे जसे की अँटीडिप्रेसेंट्स किंवा रक्तदाबाच्या औषधांमुळे लैंगिक जीवनावर परिणाम होतो. यामुळे शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते.

वाईट जीवनशैली
झोपेचा अभाव, असंतुलित आहार, धूम्रपान आणि मद्यपान यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो, ज्यामुळे लैंगिक इच्छा कमी होऊ शकते.

नियमित व्यायाम केल्याने आरोग्य सुधारते, मूड फ्रेश राहतो. जर तुम्ही ताण, चिंतेने ग्रस्त असाल तर योग करावं यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असेल तरच तुमचं लैंगिक जीवनही चांगलं राहते. मात्र खराब जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होतात.

Comments are closed.