हिटमॅनचा सुवर्ण दिवस! 11 वर्षांपूर्वी रोहित शर्माने रचला वनडे इतिहास, क्रिकेटविश्व थक्क करणारी खेळी!

11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 सालचा 13 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सदैव सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. याच दिवशी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर ‘हिटमॅन’ रोहित शर्माने काहीतरी असं केलं जे त्या काळी अकल्पनीय होतं. श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्याने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी तब्बल २६४ धावांची खेळी साकारली.

तेव्हापर्यंत वनडेमध्ये द्विशतकं झळकली होती, पण 250 पेक्षा जास्त धावा कोणीही कधी केल्या नव्हत्या. रोहितने मात्र ते शक्य करून दाखवलं. भारताने त्या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. विराट कोहली त्या सामन्यात कर्णधार होता, तर रोहितसोबत अजिंक्य रहाणे ओपनिंगसाठी उतरला. रहाणे 28 आणि अंबाती रायडू 8 धावांवर बाद झाल्यानंतर रोहितने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 202 धावांची भक्कम भागीदारी उभारली.

कोहली 66 धावांवर बाद झाला, पण त्यानंतर रोहितचा तुफानी शो सुरू झाला. त्याने 50व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी 173 चेंडूंमध्ये 264 धावा केल्या. त्यात 33 चौकार आणि 9 षटकार होते. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 152.60 होता . याआधीचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या (219) नावावर होता, जो रोहितने सहज मोडला.

रोहितने या डावात 186 धावा फक्त चौकार आणि षटकारांमधून मिळवल्या. एका वनडे डावात सर्वाधिक चौकारांचा विक्रमही त्याच्याच नावावर गेला. त्याने त्या सामन्यात तब्बल 33 चौकार लगावले. हा विक्रम आजही कायम आहे.

सुरुवातीला रोहितने संयमाने खेळ केला. पहिल्या 72 चेंडूंमध्ये त्याने फक्त 50 धावा केल्या, पण त्यानंतर त्याने गती अशी वाढवली की श्रीलंकन गोलंदाज थक्क झाले. पुढील 101 चेंडूंमध्ये त्याने 200 पेक्षा जास्त धावा केल्या. 50 ते 100 धावांचा टप्पा 28 चेंडूंमध्ये, 100 ते 150 – 25 चेंडूंमध्ये, 150 ते 200 – 26 चेंडूंमध्ये आणि 200 ते 250 – फक्त 15 चेंडूंमध्ये पूर्ण केला.

भारताने त्या सामन्यात 5 बाद 404 धावा करत श्रीलंकेवर 153 धावांनी विजय मिळवला. या डावानंतर ‘हिटमॅन’ हे नाव खऱ्या अर्थाने रोहित शर्माचं ओळख बनलं. आज बीसीसीआयने त्या ऐतिहासिक खेळीचा व्हिडिओ शेअर करत या अविस्मरणीय क्षणांना पुन्हा एकदा सलाम केला आहे.

Comments are closed.