प्रशांत दामले @13,333! विक्रमी प्रयोगानिमित्त 21 नोव्हेंबरला विलेपार्ल्यात होणार भव्य सत्कार

मराठी रंगभूमीवरचा अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेले अभिनेते प्रशांत दामले आणखी एका विक्रमाला गवसणी घालणार आहेत. लवकरच ते रंगभूमीवर 13,333वा प्रयोग सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशांत दामले यांची मुलाखत आणि भव्य सत्कार ‘विक्रमादित्य प्रशांत’ या शीर्षकांतर्गत शुक्रवार, 21 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वाजता विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहात संपन्न होणार आहे.

विलेपार्ल्यातील ‘संवेदना आर्टस्’ आणि ‘बिग पॅनव्हास एंटरटेनमेंट’ या संस्थांतर्फे गेली 2 वर्षे ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ ही मालिका आयोजित केली जात आहे, ज्यात एका कलाकाराची मुलाखत, सत्कारसोहळा आणि त्याचं कला सादरीकरण प्रस्तुत होते. या वर्षी या मालिकेतील तिसरे पुष्प संपन्न होणार आहे.  सारस्वत बँकेच्या सहयोगाने संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात अभिनेता संकर्षण कऱहाडे प्रशांत दामले यांची मुलाखत घेणार असून त्यानंतर 13,333 प्रयोगाचा विक्रम केल्यानिमित्ताने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात   प्रशांत दामले स्वतः प्रथमच त्यांना आवडणारी भावगीतं, चित्रपटगीतं सादर करणार आहेत. त्यांना सहगायिका म्हणून अभिनेत्री आणि गायिका गौतमी देशपांडे साथ देणार आहे, अशी माहिती आयोजक संतोष जोशी आणि अभिजित सावंत यांनी दिली.

Comments are closed.