लष्कर 16,000 फूट उंचीवर मोनोरेल चालवते

‘गजराज कॉर्प्स’ची मोठी कामगिरी : आता अरुणाचल प्रदेशच्या पर्वतीय प्रदेशात जवानांपर्यंत मदत सहज पोहोचणार

सर्कल/ इटानगर

भारतीय सैन्याच्या ‘गजराज कॉर्प्स’ने इन-हाऊस हाय-अॅल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. ही स्मार्ट इनोव्हेशन अरुणाचल प्रदेशातील खडकाळ पर्वतीय प्रदेशात 16,000 फूट उंचीवर चालण्यासाठी डिझाईन केलेली आहे. या सुविधेमुळे सैनिकांना आवश्यक वस्तू जलद पोहोचवता येतील. ही नवीन प्रणाली भारतीय सैन्याला कामेंग हिमालयीन प्रदेशात पुरवठा पोहोचवण्यास मदत करेल. या भागात रस्ते किंवा इतर वाहनांची सुविधा नसल्यामुळे या मोनोरेल सिस्टीममुळे अनेक लाभ होणार आहेत.

अरुणाचल प्रदेशातील पर्वतांमध्ये अरुंद रस्ते, सैल खडक, अप्रत्याशित हवामान आणि मर्यादित ऑक्सिजनमुळे लहान अंतर देखील लांब आणि कठीण वाटते. सैनिकांना अनेकदा विविध आवश्यक वस्तू त्यांच्या पाठीवर वाहून न्याव्या लागत असल्यामुळे वेळ, मेहनत आणि अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. आता, मोनोरेलमुळे वेळ आणि प्रयत्न दोन्ही वाचतील, तसेच धोका देखील कमी होणार असल्यामुळे ही प्रणाली लष्करासाठी मोठे वरदान ठरणार आहे.

गजराज कॉर्प्स : ईशान्येतील सुरक्षेचा कणा

‘गजराज’ ही भारतीय सैन्याची चौथी कॉर्प्स आहे. ही तुकडी सैन्याच्या पूर्व कमांडचा भाग असून त्याची स्थापना 4 ऑक्टोबर 1962 रोजी चीन-भारत युद्धादरम्यान झाली होती. या तुकडीला ईशान्य सुरक्षेचा कणा मानला जातो. आसाममधील तेजपूर येथे मुख्यालय असलेले ‘गजराज कॉर्प्स’ ईशान्य भारतातील सुरक्षा, बंडखोरीविरोधी कारवाया आणि सीमा व्यवस्थापनातील सर्वात सक्रिय आणि धोरणात्मक कॉर्प्स मानले जाते. या कॉर्प्समध्ये 71 वा माउंटन डिव्हिजन, 5 वा बॉल ऑफ फायर डिव्हिजन आणि 21 वा रिअल हॉर्न डिव्हिजन यांचा समावेश आहे.

1962 च्या चीन-भारत युद्धात या कॉर्प्सने सक्रिय भूमिका बजावली होती. त्यावेळी नव्याने स्थापन झालेल्या ‘गजराज कॉर्प्स’च्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांचे रक्षण केले. गजराज म्हणजे हत्ती अशा अर्थाने सदर तुकडीला शक्ती, स्थिरता आणि शौर्याचे प्रतीक मानले जाते. ईशान्य भारतातील हत्तींचे प्राबल्य आणि या कॉर्प्सची ताकद प्रतिबिंबित करण्यासाठी ‘गजराज कॉर्प्स’ हे नाव निवडण्यात आले होते.

'गजराज कोर' विशेषतः

‘गजराज कॉर्प्स’चे सैनिक आधुनिक शस्त्रs आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. त्यात आधुनिक तोफखाना, तोफखाना रॉकेट प्रणाली, उच्च-तंत्रज्ञान देखरेख उपकरणे आणि विशेष पर्वतीय युद्ध प्रशिक्षण समाविष्ट आहे. गोपनीयतेमुळे संपूर्ण रचना सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्या तरी त्यात सामान्यत: एक पायदळ विभाग, एक पर्वतीय विभाग, एक अभियांत्रिकी ब्रिगेड, एक तोफखाना ब्रिगेड, एक विशेष दल युनिट आणि एक हवाई संरक्षण युनिट समाविष्ट असल्याचे मानले जाते.

'गजराज कॉर्प्स'ची मुख्य कार्ये…

चीन, तिबेटच्या सीमेवर देखरेख

वास्तविक नियंत्रण रेषेवर तैनात

मोक्याच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था

बंडखोर गटांविरुद्धच्या कारवाया

रहिवासी भागात स्थिरता राखणे

शत्रू सैन्यांविरुद्धच्या कारवाया

पर्वत व जंगलभागातील सज्जता

पूर, भूकंप, भूस्खलनप्रसंगी मदत

बचाव, वैद्यकीय, लॉजिस्टिक सपोर्ट

Comments are closed.