माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम; गुरु-शिष्यांच्या नृत्याविष्काराने स्थापन केला विक्रम
जगात सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर तीन ठिकाणी उणे आठ अंशाच्या तापमानात कोल्हापूरच्या तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या साथीने दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या शिष्यांनी भरतनाट्यम सादर करून नवा विक्रम प्रस्थापित केला.
थंगबोचे मॉनेस्ट्री (१३ हजार फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७ हजार ६५० फूट) आणि काला पत्थर (१८ हजार २०० फूट) या ठिकाणी भरतनाट्यम सादर करून एव्हरेस्टला मानवंदना देण्यात आली.
कोल्हापूरच्या गुरू नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील व त्यांच्या शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि पुण्याची प्रांजल दळवी या सहभागी झाल्या होत्या. थंगबोचे येथे या चौघींनी गणपती स्तुती, त्यानंतर काला पठार येथे शिव श्लोक आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे पहिल्यांदा संयोगिता पाटील यांनी ६ मिनिटांचा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला. त्यानंतर चौघींनी पावणेसात मिनिटांची यावेळी सर्वांचे मंगल व्हावे या भावनेने भज गोविंदम ही कृष्ण वंदना सादर केली. मंगलम् सादर करण्यात आले.
एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करताना तापमानामधील चढ-उतार, गोठवणारी थंडी, सलग पाच दिवस झालेली बर्फवृष्टी अशी नव्यानेच अनुभूती घेत भरतनाट्यम्चे पहिले सादरीकरण हे १२ हजार ६८७ फूट उंचीवर झाले. यानंतरचा प्रवास हा धीम्या गतीचा अतिशय अवघड व जोखमीचा होत गेला. अतिशय कमी तापमानामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यात भरतनाट्यमसाठी संपूर्ण तयार होऊन त्या बर्फात पायातील बूट काढून नृत्य करायचे होते. दुसरे सादरीकरण हे १७ हजार ६५० फूट उंचीवर झाले. यानंतरचा प्रवास अजूनच अवघड व शर्थीचा झाला. अतिशय कमी म्हणजे उणे ८ अंश तापमानात सर्व मनोबल एकवटून १८ हजार २०० फूट उंचीवर नृत्य सादरीकरण केले. यामध्ये मंगलम्सुद्धा सादर केले. जगात प्रथमच अशाप्रकारे भरतनाट्यमचा नृत्याविष्कार सादर झाला.
शास्त्रीय नृत्याचे जतन व जगात सुरू असलेल्या सर्व गोष्टींमध्ये शांतता निर्माण होऊन सर्वांचे मंगल व्हावे, कल्याण व्हावे, असा मुख्य उद्देश या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम् सादर करण्यामागे असल्याचे सांगताना हा अनुभव आमच्या सर्वांसाठीच अविस्मरणीय असल्याचे संयोगिता पाटील यांनी यावेळी सांगितले. यामध्ये कोल्हापूरमधील नामांकित डॉक्टर, व्यावसायिक व्यक्ती होत्या. प्रसिद्ध गिर्यारोहक विनोद कंबोज आणि खुशी कंबोज यांनी या ट्रॅकचे आयोजन केल्याचेही संयोगिता पाटील यांनी यावेळी सांगितले.
गिनिज, एशियासह इंडिया बुकमध्येही नोंद
संयोगिता पाटील यांनी यापूर्वी सलग १३ व ६६ तास भरतनाट्यम् नृत्य सादर केले आहे. तसेच छत्रपती शाहू स्टेडियम येथे २ हजार १०० जणांच्या सहभागातून सामुदायिक भरतनाट्यम् सादर करून, ५७४ हुन अधिक जणांचा समावेशातून भरतनाट्यम् आणि लावणी मिलाप सादर करून, त्याची गिनिज बुकसाठी नोंद झाली आहे. तसेच जगातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर असलेल्या अन्नपूर्णा बेस कॅम्पवरही भरतनाट्यम् सादरीकरण करून, एशिया व इंडिया बुकमध्ये नोंद केली आहे.
Comments are closed.