ईशाचा कांस्यावर निशाणा, हिंदुस्थानची जागतिक नेमबाजीत पदकविजेती कामगिरी सुरूच

हिंदुस्थानची युवा नेमबाज ईशा सिंहने जागतिक नेमबाजी स्पर्धेत पुन्हा एकदा आपल्या अचूक नेमबाजीची छाप पाडत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत ईशाने ३० गुणांची कमाई करत चीनच्या याओ कियानक्सुन आणि कोरियाच्या विद्यमान ऑलिंपिक विजेत्या यांग जिन यांच्या पाठोपाठ तिसरे स्थान पटकावले. पॅरिस ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरला मात्र पुन्हा एकदा पोडियमवर स्थान मिळवण्यात अपयश आले.
हिंदुस्थानचा पदकवर्षाव
ईशाच्या कांस्यासह हिंदुस्थानने या स्पर्धेत एक सुवर्ण, चार रौप्यआणि दोन कांस्य अशी सात पदके जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. एकूण तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदकांच्या जोरावर हिंदुस्थान क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. चीनने १० सुवर्णांसह अव्वल स्थान पटकावले तर कोरियाने सहा सुवर्णांसह दुसरे स्थान मिळवले.
ईशाचे वर्षातील तिसरे वैयक्तिक आयएसएसएफ पदक
रॅपिड फायर पात्रता फेरीतही ईशा दमदार ठरली. तिने ५८७ गुणांसह टॉप-८ मध्ये पाचव्या स्थानावर प्रवेश केला, तर मनू भाकर ५८६ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिली. राही सरनोबतने ५७२ गुण मिळवले, परंतु या गुणसंख्येमुळे हिंदुस्थानी त्रिकुटाला सांघिक पदक मिळवता आले नाही. १७४५ गुणांसह संघ चौथ्या स्थानी राहिला आणि केवळ तीन गुणांमुळे फ्रेंच संघाच्या मागे पडला. या वर्षीचे हे ईशा सिंहचे तिसरे वैयक्तिक आयएसएसएफ पदक ठरले आहे. यापूर्वी तिने विश्वचषक टप्प्यात सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकत आपली सातत्यपूर्ण कामगिरी अधोरेखित केली होती.

Comments are closed.