IND vs SA: बुमराहची कहर कामगिरी; पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम मोडीत
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फॉर्मात खेळत असला, तरी त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटवरून सातत्याने टीका होत आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या दुखापतींमुळे बुमराह अनेक सामने चुकवत होता. त्यामुळे तो स्वतःच सामने निवडतो, वर्कलोडच्या नावाखाली खेळणे टाळतो, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.
कोलकाता कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बुमराहला याच मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांवर त्याने थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. “जे लोक हा प्रश्न विचारत आहेत, ते त्यांच्या प्रश्नांशी राहू द्या. हे माझे प्रश्न नाहीत. मी कुठल्याही फॉर्मेटमध्ये खेळलो तरी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो,” असे बुमराह म्हणाला.
बुमराहने पुढे सांगितले की, तो आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आवश्यक ते करतो. विश्रांती, रिहॅब, तयारी हे सर्व खेळाडू म्हणून आवश्यक असल्याचं तो म्हणाला. “आराम, प्रश्न-उत्तर, वाद-विवाद… ज्यांना जे करायचं आहे त्यांनी करत राहावं. मला मैदानात चांगलं योगदान देण्यात आणि नवनव्या गोष्टी शिकण्यात आनंद मिळतो,” असे त्याने स्पष्ट केले.
दुसरीकडे, टीकेला उत्तर देताना बुमराहने मैदानात आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. इंग्लंड दौरा, आशिया कप, वेस्ट इंडिज कसोटी मालिका, ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 असे अनेक सामने खेळल्यानंतर तो सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत झळकतो आहे. पहिल्या कसोटीत फिरकीला मदत करणाऱ्या विकेटवरही बुमराहने केवळ 27 धावांत 5 विकेट्स घेत अफलातून गोलंदाजी केली.
वर्कलोड मॅनेजमेंटवरून सतत चर्चा सुरू असली तरी बुमराहने स्पष्ट सांगितले की त्याचा फोकस केवळ खेळावर आहे. टीकाकार काय म्हणतात त्याकडे लक्ष न देता तो मैदानात कामगिरी करूनच उत्तर देत राहणार असल्याचे त्याच्या भूमिकेतून स्पष्ट झाले.
Comments are closed.