शुबमन गिल रिटायर्ड हर्ट! बीसीसीआयकडून दुखापतीवर मोठं अपडेट; दुसऱ्या डावात खेळणार का नाही?
कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारतीय कर्णधार शुबमन गिल फक्त तीन चेंडू खेळल्यानंतर रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला.
दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गिल फलंदाजीला आला होता. आफ्रिकन फिरकीपटू सायमन हार्मरच्या चेंडूवर त्याने तिसऱ्या चेंडूला स्वीप शॉट मारत चौकार मिळवला. मात्र, याचवेळी त्याच्या मानेमध्ये तीव्र ताण जाणवल्याने तो वेदनेत दिसला. फिजिओशी चर्चा केल्यानंतर गिलने तात्काळ मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
लंचनंतर बीसीसीआयने सोशल मीडियावरून गिलच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती दिली. बोर्डाने सांगितले की, गिलला मानेमध्ये स्ट्रेन झाला आहे आणि सध्या तो मेडिकल टीमच्या सततच्या देखरेखीखाली आहे. तो पुन्हा या सामन्यात फलंदाजीला उतरतील की नाही, याचा निर्णय त्याच्या प्रकृतीनुसार घेतला जाईल.
ईडन गार्डन्सवरील पिचवर फलंदाजी करणे दोन्ही दिवस अत्यंत कठीण ठरत आहे. पहिल्या दिवशी जिथे 11 विकेट्स पडल्या, तिथे दुसऱ्या दिवशीही परिस्थिती फारशी बदललेली नाही. अशा वेळी गिल पुन्हा मैदानात उतरला नाहीत तर टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो, विशेषतः चौथ्या डावात या पिचवर बॅटिंग करणे आणखी अवघड ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या होत्या.
Comments are closed.