शाळेत उशीरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला लावल्या, सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू

वसईतील एका शाळेत शिक्षकाने शाळेत उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात एका तेरा वर्षीय विद्यार्थीनीची तब्येत बिघडलेली. शनिवारी रात्री तिचा मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काजल (अंशिका) गौड असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांनीचे नाव आहे. ती सातिवली येथील श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेत इयत्ता सहावी मध्ये शिकत होती.

वसई पूर्वेच्या सातीवली येथील कुवरा पाडा परिसरात श्री हनुमंत विद्यामंदिर शाळा आहे. यात पहिली ते आठवी पर्यँतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. यात काजल गौंड ही विद्यार्थीनी इयत्ता सहावी (अ) वर्गात शिकत होती. 8 नोव्हेंबर सकाळी अनेक विद्यार्थी शाळेत उशिराने आले होते. यात काजल या विद्यार्थ्यांनीचा देखील समावेश होता. विद्यार्थी उशिरा आले म्हणून शिक्षकांनी त्यांना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढल्या. काजलने देखील सर्वांसोबत उठाबशा काढल्या.

शाळेतून घरी परतल्यानंतर मात्र काजलची तब्येत बिघडली त्यामुळे तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर अन्य एका रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती आणखीनच खालावल्याने तिला मुंबईच्या जे जे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. जेजे मध्ये उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास या काजलचा मृत्यू झाला.

शाळा व्यवस्थापन व शिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलीवर ही वेळ आली असल्याचा आरोप काजलच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या घडलेल्या घटनेनंतर पालक व विद्यार्थ्यांनीही शाळेजवळ मोठी गर्दी केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात आक्रमक भूमिका घेत शाळेला टाळे ठोकले आहे. शिक्षिकेवर गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा इशाराही दिलाय.

या घडलेल्या घटनेनंतर वालीव पोलिसांनी शाळेत व रुग्णालयात जाऊन तपासाला सुरवात केली आहे. जे जे रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले आहेत. या घटनेची संपुर्ण माहिती घेऊन पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती वालीव पोलिसांनी दिली आहे.

शिक्षण विभागाकडून चौकशी होणार

सातीवली येथील हनुमंत विद्यामंदिर शाळेत सहावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यूची घटना कळली आहे.त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी येऊन माहिती घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे, असे वसईचे गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच सर्व शाळांना शिक्षण विभागाकडून सूचना केल्या जातात आरटीई २००९ च्या शिक्षण कायद्यात अशी तरतूद आहे की विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा करणे हा गुन्हा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पालघरमधील ही दुसरी घटना

पालघर शहरात असलेल्या भगिनी समाज विद्यालयात 13 वर्षीय विद्यार्थिनीला शाळेत येण्यास पाच मिनिटं विलंब झाला म्हणून मुख्याध्यापिकेने तब्बल 50 उठाबशा काढायला लावल्याची जानेवारी महिन्यात घटना घडली होती. त्यामुळे विद्यार्थिनीची प्रकृतीच ढासळली व तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकांनी माफी मागितल्यामुळे सामंजस्याने तक्रार मागे घेण्यात आली होती.

Comments are closed.