Sangameshwar News – सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ताडोबाची चंदा वाघीण दाखल

वन विभागाने ‘ऑपरेशन चंदा’ या व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तरुण वाघिणीचे यशस्वीरीत्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
सुमारे तीन वर्षांची ही वाघीण एनटीसीएच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडण्यात आली. तिला योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे समर्पित वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून स्थलांतरित करण्यात आले. सध्या तिला सोनारली येथील एनक्लोजरमध्ये ‘सॉफ्ट रिलीज’ पद्धतीने सोडण्यात आले असून, पुढील टप्प्यांत वनात सोडण्यापूर्वी तिचे निरीक्षण करण्यात येणार आहे.
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व पेंच व्याघ्र प्रकल्प येथील तीन नर व पाच मादी अशा एकूण आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प येथे स्थानांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यातील पहिल्या वाघीणीचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आगमन झाले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया काटेकोर सुरक्षा मानदंड पाळून व सततच्या निरीक्षणाखाली झाली.

Comments are closed.