IPL 2026: केकेआर सर्वात श्रीमंत, मुंबई कंगाल! मिनी लिलावापूर्वी फ्रेंचायझीकडे किती पैसे शिल्लक?

आयपीएल 2026 स्पर्धेची रंगत रिटेन्शन यादी जाहीर होताच वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फ्रेंचायझींनी ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंच्या देवाणघेवाणीवर भर दिला. काही संघांना या प्रक्रियेत यश मिळालं असून, आता सर्व फ्रेंचायझींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची अधिकृत यादी जाहीर केली आहे.

फ्रेंचायझींना आयपीएलमध्ये 120 कोटींच्या पर्सचा अधिकार आहे. त्यामुळे मिनी लिलावात कोण किती पर्ससह उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा मिनी लिलाव असल्याने बहुतेक संघांनी जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याचा निर्णय घेतला. रिटेन्शननंतर प्रत्येक संघाकडे किती रक्कम उरली याची उत्सुकता वाढली आहे.

यंदाच्या लिलावात सर्वाधिक रक्कम कोलकाता नाईट रायडर्सकडे आहे. केकेआरच्या पर्समध्ये तब्बल 64.3 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सचा नंबर लागतो. 9 खेळाडूंना रिलीज केल्यानंतर सीएसकेच्या खात्यात 43.4 कोटी रुपये उपलब्ध आहेत.

सनरायझर्स हैदराबादकडे 25.5 कोटी आणि लखनऊ सुपर जायंट्सकडे 22.95 कोटींची पर्स शिल्लक आहे. दिल्ली कॅपिटल्सकडेही या लिलावासाठी 21.18 कोटी रुपये उपलब्ध आहेत. रवींद्र जडेजाला संघात घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सकडे 16.05 कोटींची पर्स उरली आहे.

दरम्यान, मागील पर्वाचे विजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी यावेळी 9 खेळाडूंना रिलीज केले असून त्यांच्या पर्समध्ये 16.4 कोटी रुपये आहेत. गुजरात टायटन्सकडे 12.9 कोटी आणि पंजाब किंग्सकडे 11.5 कोटी रुपये उपलब्ध आहेत.

सर्वात कमी रक्कम मुंबई इंडियन्सकडे आहे. एमआयच्या पर्समध्ये केवळ 2.75 कोटी रुपये शिल्लक असून, या मर्यादित निधीतूनच त्यांना लिलावातील रणनीती आखावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा लिलाव मुंबईसाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

एकूणच, आगामी मिनी लिलावात कोलकाता आणि चेन्नईमध्ये खेळाडूंसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 चा मिनी लिलाव 16 डिसेंबर रोजी दुबईत आयोजित करण्यात आला असून, ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होणार आहे.

Comments are closed.