अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कामगारांना भरघोस पगारवाढ, विद्युत कामगार सेनेच्या प्रयत्नांना यश

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ करण्यात आली आहे. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी शिवसेना स्थानीय लोकाधिकार समितीचे व विद्युत कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
गेली अनेक वर्षे हा करारनामा सुप्रीम कोर्टात प्रलंबित असूनसुद्धा व्यवस्थापनाने युनिलेटरिंगच्या माध्यमातून सध्याच्या वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या कामगारांची पगारवाढ केली. विद्युत कामगार सेनेचे सरचिटणीस मंगेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व आस्थापनातील इतर नऊ नोंदणीकृत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा पगारवाढीचा करार संपन्न झाला.
अशी होणार पगारवाढ
- करारानुसार ऑक्टोबर 2024 ते ऑक्टोबर 2029 या पाच वर्षांकरिता कायमस्वरूपी कामगारांना बेसिकमध्ये 28 टक्के पगारवाढ करण्यात आली. नवीन रुजू झालेल्या कामगाराला 10 ते 18 हजार रुपयांची वाढ तसेच दीर्घ सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱयांना 18 हजार ते 40 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
- तसेच मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला 50 ते 60 हजारापर्यंत मदत करण्यात येणार आहे. कंत्राटी कामगारांना ऑक्टोबर 2025 पासून 27,456 ते 31,772 रुपयांची, स्कील कंत्राटी कामगारांना 31,304 ते 36,244 रुपयांची तसेच हाऊस किपिंग कामगारांना 21,450 ते 24,830 रुपयांची पगारवाढ करण्यात आली. वेतन कराराची थकबाकी दीड लाख ते चार लाखांपर्यंत देण्यात येणार आहे.
निवृतीचे वय 60 वर
निवृत्तीचे वय 60 करण्यात आले आहे. कर्मचाऱयांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कंत्राटी कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला 10 लाख रुपये व अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 15 लाख रुपये देण्यात येणार आहे. कंत्राटी कामगारांचा बेनेवल फंड, स्कील कामगार व भरती या विषयावर लवकरच एक बैठक घेऊन त्यावर गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Comments are closed.