न्यू हॉलीवूड – वास्तववादातून गुन्हेगारीचा मागोवा
>> अक्षय शेलार, [email protected]
गुन्हेगारपट आणि भयपटाच्या नियमित चौकटीपासून दूर जात स्ट्रीट-लेव्हल वास्तववाद स्वीकारणारा ‘द फ्रेंच कनेक्शन’ चित्रपट. न्यूयॉर्कच्या थंड, उदासीन रस्त्यांवर घडणाऱया या चित्रपटातील संघर्षातून अमेरिकन शहरी जीवनातील असुरक्षितता व उघड भय उलगडते.
विल्यम फ्रिडकिन या दिग्दर्शकाने न्यू हॉलीवूड चळवळीतील दोन महत्त्वाचे चित्रपट बनवले. त्यातला पहिला सिनेमा म्हणजे ‘द फ्रेंच कनेक्शन’ (1971), तर दुसरा ‘दी एक्सॉर्सिस्ट’ (1973). फ्रिडकिनच्या या चित्रपटांनी अनुक्रमे गुन्हेगारपट आणि भयपट या दोन प्रकारांच्या पारंपरिक चौकटी मोडीत काढून त्यात एक धीट ताजेपणा आणला. याआधीचे हॉलीवूड गुन्हेगारपट किंवा पोलिसी कथानक असलेले चित्रपट बहुधा शैलीबाज, नेटक्या प्रकाशयोजनांनी सजलेले असत. ‘द फ्रेंच कनेक्शन’ने या चौकटीपासून जाणीवपूर्वक दूर जात स्ट्रीट-लेव्हल वास्तववाद स्वीकारला. हा सिनेमा न्यूयॉर्कच्या थंड, उदासीन रस्त्यांवर घडतो. या रस्त्यांवर पोलीस आणि ड्रग्ज कार्टेल यांच्यातील संघर्षातून अमेरिकन शहरी जीवनातील असुरक्षितता व उघड भय उलगडते.
जिमी ऊर्फ पॉपआय डॉयल (जीन हॅकमॅन) हे पात्र या सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे. तो एक पोलीस आहे, परंतु पारंपरिक ‘नायक’ नाही. तो रागीट स्वभावाचा असून त्याची कार्यशैली नैतिकदृष्टय़ा संदिग्ध आहे. तो गुन्हेगारांना पकडण्यासाठी नियम मोडतो, संशय आल्यावर अतिरेकी पावले उचलतो आणि त्याच्या ‘जस्टिफिकेशन’मध्ये एक प्रकारचा हिंसक हट्ट आहे. हॅकमॅनने साकारलेली ही व्यक्तिरेखा न्यू हॉलीवूडच्या धाटणीला अगदी साजेसी आहे. फ्रिडकिनचा दिग्दर्शन शैलीचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. कॅमेऱयाची हालचाल, हॅण्डहेल्ड शॉट्स, नैसर्गिक प्रकाश, गर्दीने भरलेली शहरी दृश्ये या साऱयांमुळे चित्रपटातला तणाव जिवंत वाटतो. हा सिनेमा आपल्याला जणू न्यूयॉर्कच्या रस्त्यावर घेऊन जातो, जिथे प्रत्येक गल्लीमध्ये तणाव पसरलेला आहे आणि प्रत्येक चेहरा धोकादायक भासतो. यातील कार चेझ सीन चित्रपट इतिहासात क्लासिक मानला जातो.
या सिनेमात सामाजिक संदर्भही महत्त्वाचे आहेत. 1970 च्या दशकात अमेरिकेत ड्रग्सच्या वाढत्या तस्करीविषयी मोठी चिंता होती. व्हिएतनाम युद्धानंतरचे निराशाजनक वातावरण, शहरी जीवनातील गुन्हेगारी आणि भ्रष्ट व्यवस्थेवरचा अविश्वास या सर्व प्रश्नांचा अंश ‘द फ्रेंच कनेक्शन’मध्ये येतो. पोलिसाच्या पात्राला इथे सेव्हिअर, अर्थात तारणहार म्हणून दाखवलेले नाही. त्यामुळे सिनेमा वास्तवाच्या तणावाला, अस्वस्थतेला स्पर्श करतो. यामुळे सिनेमा अत्यंत कोरडा आणि भावनारहित भासतो. त्यात मानवी संवेदनांना कमी वाव आहे, पण हेच चित्रपटाचं वैशिष्टय़ही आहे. हा सिनेमा ग्लॅमरच्या पडद्यामागे लप(व)लेली शहराची कुरुपता दाखवतो. या चित्रपटाने न्यू हॉलीवूड चळवळीतील दोन महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या ः एक म्हणजे प्रेक्षक आता अधिक परिपक्व झाले होते आणि त्यांना केवळ मनोरंजन नको होते, त्यांना वास्तवाचा धक्का हवा होता. दुसरे म्हणजे हॉलीवूडचे नवीन दिग्दर्शक सिनेमाच्या भाषेत धाडसी प्रयोग करायला तयार होते. ‘द फ्रेंच कनेक्शन’ला मिळालेले ऑस्कर पुरस्कार म्हणजे या बदलाची संस्थात्मक नोंद ठरली.
‘द फ्रेंच कनेक्शन’ हा न्यू हॉलीवूडचा आदर्श नमुना यासाठीही आहे की, धाडसी दिग्दर्शक, संदिग्ध नायक, सामाजिक वास्तवाशी भिडणारा दृष्टिकोन आणि स्टायलिश चित्रपटीय भाषेऐवजी खरं आयुष्य दाखवणारी दृष्टी असं सारंच यात पाहायला मिळतं. म्हणूनच आजही हा सिनेमा केवळ एक क्राइम-थ्रिलर म्हणून नव्हे, तर अमेरिकन समाजातील, तसेच सिनेमातील संक्रमणकाळाचा दस्तऐवज म्हणून ठळकपणे नजरेत भरतो.
‘द फ्रेंच कनेक्शन’चा प्रभाव पुढच्या हॉलीवूड गुन्हेपटांवर स्पष्टपणे जाणवतो. या चित्रपटामुळे 70 च्या दशकात आलेल्या किंवा ‘हीट’सारख्या (1995) अगदी नंतरच्या सिनेमांनी पोलीस पात्रांची गुंतागुंत अधिक वास्तववादी केली. जिमी डॉयलसारखा पोलीस अधिकारी भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या मार्गावर चालतो. तो न्यायाच्या नावाखाली किती हिंस्र होऊ शकतो, हा प्रश्न या सिनेमातून उभा राहतो.
यातील शेवटही न्यू हॉलीवूडच्या शैलीला साजेसा आहे. गुन्हेगारीचा मागोवा घेताना डॉयल एका सहकाऱयालाच गोळी घालतो आणि गुन्हेगार पळून जातो. हा शेवट केवळ अपूर्ण नाही, तर समाजातल्या सततच्या असुरक्षिततेचे प्रतीक आहे. या चित्रपटात न्यूयॉर्क शहर स्वत एक व्यक्तिरेखा ठरते. बर्फाच्छादित रस्ते, ओसाड इमारती, निऑन दिव्यांच्या सावल्या या सर्व दृश्यांमधून अमेरिकन शहरी जीवनातील करडेपणा प्रकट होतो. फ्रिडकिनच्या कॅमेऱयाने शहराचं ग्लॅमर नाही, तर त्याची धोकादायक रूपं दाखवली. यामुळे सिनेमा 70 च्या दशकातील शहरी संस्कृतीचे एक भयावह चित्रण बनतो.
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)
Comments are closed.