Health Tips: तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे? पोषणतज्ञांनी सांगितली गंभीर लक्षणं

पाणी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याने केवळ तहानच भागत नाही तर शरीराचं कार्य व्यवस्थित सुरू राहते. तज्ञांच्या मते, प्रत्येक प्रौढ व्यक्तीने दररोज किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचं असतं. मात्र कामाचा लोड, व्यस्त जीवनशैलीमुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. कालांतराने शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि अनेक गंभीर समस्या होण्याचा धोका असतो. काही लक्षणं ही शरीरात पाण्याच्या कमतरतेचे संकेत असल्याचं तज्ञ सांगतात.

केसगळती
डिहायड्रेशनमुळे टाळू कोरडा होतो, ज्यामुळे केस कमकुवत होतात आणि तुटतात. जर तुम्हाला जास्त केसगळतीची समस्याहोत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असू शकते.

त्वचेच्या समस्या
निरोगी त्वचेसाठी ती हायड्रेट राहणं गरजेचं आहे. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा त्वचेवर थेट परिणाम होतो. त्वचा कोरडी होते आणि अनेक समस्या वाढतात.

अ‍ॅनिमिया
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते आणि अशक्तपणा जाणवतो.

तोंडाची दुर्गंधी
जर दररोज दात घासल्यानंतरही तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल, तर ते पाण्याच्या कमतरतेचे लक्षण आहे. कमी पाणी प्यायल्याने तोंड कोरडे होते. परिणामी लाळेचे उत्पादन कमी झाल्यामुळे बॅक्टेरिया वाढतात आणि तोंडाची दुर्गंधी येते.

चिंता आणि ताण
जेव्हा शरीर डिहायड्रेट होते, तेव्हा त्याचा मेंदूच्या आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे मूड स्विंग, चिडचिड आणि ताण वाढतो.

डोकेदुखी
डिहायड्रेशनमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो, ज्यामुळे डोकेदुखी जाणवते.

थकवा आणि अशक्तपणा
शरीराला उर्जेसाठी पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा शरीरात पुरेसे पाणी नसते तेव्हा थकवा, आळस आणि अशक्तपणा जाणवतो. जर तुम्हाला काही दिवसांपासून ही लक्षणं जाणवत असतील तर जास्त पाणी पिणं गरजेचं आहे.

Comments are closed.