शेन वॉर्नचा ‘रॉकस्टार’ बॅक टू होम! आयपीएल, राजस्थान रॉयल्स अन् जड्डूची कहाणी


रवींद्र जडेजा आयपीएल 2026 : अवघ्या विशीतला एक युवा खेळाडू. अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून दिल्यानं त्याचं थोडसं नाव झालं होतं. रणजी करंडकातही त्यानं आपली जादू दाखवली होती. पण 2008 साली सुरु झालेल्या IPL ने त्याचं आयुष्य बदलून टाकलं. हा तोच काळ होता जेव्हा रवींद्र जाडेजा नावाचा हा ‘रॉकस्टार’ क्रिकेटर घडत होता. आणि त्याच्या या जडणघडणीत मोठं योगदान होतं ते एका बड्या फ्रँचायझीचं. राजस्थान रॉयल्सचं.

2008 : आयपीएलचा जन्म

2008 साली भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी क्रांती झाली. टी20 क्रिकेटची लोकप्रियता वाढत असतानाच बीसीसीआयनं फुटबॉल लीगच्या धर्तीवर आयपीएल जन्माला घातलं. आठ फ्रँचायझी, जगातले बडे खेळाडू, त्यांचं ऑक्शन… सगळं स्वप्नवत आणि भारी वाटावं असं हे सगळं भरभर घडत होतं. आयपीएल खेळणाऱ्या त्या आठ फ्रँचायझीपैकी एक होती राजस्थान रॉयल्स. त्या टीमचा कर्णधार होता महान ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर शेन वॉर्न. पहिलीच स्पर्धा… पण वॉर्नच्या संघात त्यावेळी फार मोठे स्टार नव्हते. यंगस्टर्सचा भरणा जास्त होता. आणि त्याच यंगस्टर्सपैकी एक होता 19 वर्षांचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा.

शेण वारांची नजर

शेन वॉर्न त्यावेळी राजस्थान रॉयल्सचा सर्वेसर्वा होता. त्यानं जाडेजामधलं टॅलेंट आधीच ओळखलं होतं. त्यानं त्याला टोपणनावंही दिलं होतं, ‘रॉकस्टार’. आयपीएलच्या त्या पहिल्याच सीझनमधला रवींद्र जाडेजाचा खेळ पाहून “हा मुलगा एक दिवस भारतीय संघात खेळेल!” असं शेन वॉर्ननं म्हटलं होतं. सातत्यपूर्ण खेळ, काही मॅचविनिंग इनिंग्स आणि दबावात असताना चांगला खेळणारा खेळाडू अशी जाडेजाची ओळख बनली. फिल्डिंगमध्ये तर तो युवराज, मोहम्मद कैफनंतर त्यावेळचा सर्वोत्तम असंच म्हणवं लागेल. 2008 सालच्या राजस्थान रॉयल्सच्या त्या पहिल्यावहिल्या सीझनच्या पहिल्या जेतेपदात रवींद्र जाडेजाचं योगदान कमी असलं तरी त्याची संघातली भूमिका महत्वाची होती.
Ravindra Jadeja IPL Story : शेन वॉर्नचा ‘रॉकस्टार’ बॅक टू होम! आयपीएल, राजस्थान रॉयल्स अन् जड्डूची कहाणी

एक चूक आणि मोठी शिक्षा

2009 च्या सीझनमध्ये जाडेजानं चांगली कामगिरी केली. त्याच्याकडून संघाच्या अपेक्षा उंचावत होत्या. पण 2010 च्या सीझनआधी रवींद्र जाडेजाकडून एक मोठी आणि गंभीर चूक घडली. राजस्थान रॉयल्समध्ये असताना आपल्या फ्रँचायझीला अंधारात ठेऊन जाडेजानं आयपीएल काँट्रॅक्टबाबत अन्य फ्रँचायझीशी चर्चा केली. आणि त्याच्या या कृत्याबद्दल आयपीएलच्या शिस्तपालन समितीनं त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली. राजस्थान रॉयल्ससाठी हा एक फार मोठा धक्का होता. तर नुकतीच कारकीर्द सुरु करु पाहणाऱ्या जाडेजासाठी एक मोठा धडा.
Ravindra Jadeja IPL Story : शेन वॉर्नचा ‘रॉकस्टार’ बॅक टू होम! आयपीएल, राजस्थान रॉयल्स अन् जड्डूची कहाणी

राजस्थाननं सोडलं, सीएसकेनं उचललं

2010 सालच्या त्या प्रकरणानंतर राजस्थानसोबतचा रवींद्र जाडेजाचा प्रवास संपला. पण जाडेजा थांबला नाही. बंदी उठवल्यानंतर जाडेजाला जागा मिळाली ती त्यावेळचा टीम इंडियाचा एक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाजलेल्या चेन्नई सुपर किंग्समध्ये. खरं तर रवींद्र जाडेजाच्या आयपीएल करियरमधील हा एक मोठा टर्निंग पॉईंट ठरला. कारण त्यानंतर पुढची तब्बल 12 वर्ष (सीएसकेवर बंदी असलेली दोन वर्ष सोडून) जाडेजा आणि सीएसके हे समीकरणच बनलं होतं. धोनीनंतर सीएसकेमध्ये सर्वात जास्त चर्चा होणाऱ्या नावांमध्ये एक होतं ते रवींद्र जाडेजाचं नाव.
Ravindra Jadeja IPL Story : शेन वॉर्नचा ‘रॉकस्टार’ बॅक टू होम! आयपीएल, राजस्थान रॉयल्स अन् जड्डूची कहाणी

‘रॉकस्टार’ बॅक टू होम

2026 च्या आयपीएल ऑक्शनआधी ट्रेड विंडो खुली झाली. त्यावेळी राजस्थान रॉयल्सनं संजू सॅमनसच्या बदल्यात चेन्नई सुपर किंग्सकडून मागणी केली ती थेट रवींद्र जाडेजाची. त्यांनीच घडवलेल्या एका हिऱ्याची. काही दिवस वाट पाहिल्यानंतर हा ट्रेड यशस्वी झाला. आणि रवींद्र जाडेजा 2010 नंतर पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या संघात सामील झाला. त्यासाठी राजस्थाननं तब्बल 13 कोटी रुपये मोजले आहेत.
Ravindra Jadeja IPL Story : शेन वॉर्नचा ‘रॉकस्टार’ बॅक टू होम! आयपीएल, राजस्थान रॉयल्स अन् जड्डूची कहाणी

'सर' रवींद्र जडेजा

आयपीएलसह गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही रवींद्र जाडेजा या नावानं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. जाडेजा हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतला अव्वल खेळाडू आहे. अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. पण हा रॉकस्टार ज्या मुशीत घडला, ती म्हणजे राजस्थान रॉयल्स. शेन वॉर्नचे ते शब्द, त्यानंतर जाडेजानं घेतलेली मेहनत, मिळालेल्या संधीचा करुन घेतलेला पुरेपर वापर यामुळे रवींद्र जाडेजाला भारतीय क्रिकेटमध्ये आज सर रवींद्र जाडेजा या नावानं ओळखलं जातं.
Ravindra Jadeja IPL Story : शेन वॉर्नचा ‘रॉकस्टार’ बॅक टू होम! आयपीएल, राजस्थान रॉयल्स अन् जड्डूची कहाणी

कधी कधी एका खेळाडूचा प्रवास जिथे सुरू होतो, ती जागाच त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. जाडेजाच्या IPL प्रवासाचा पहिला अध्याय हा राजस्थान रॉयल्ससोबत लिहिला गेला. या फ्रँचायझीनं एका सुपरस्टार क्रिकेटरची पायाभरणी केली. आपल्या त्याच जुन्या घरी जड्डू परतला आहे. त्यामुळे उत्सुकता आहे ती आयपीएलच्या आगामी सीझनची.

आणखी वाचा

Comments are closed.