मुंबई महापालिकेवर नगरविकास विभागाची कृपादृष्टी, साडेआठ कोटी रुपयांची विशेष तरतूद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता असली तरी मुंबई महानगरपालिकेवर नगरविकास विभागाची कृपादृष्टी सुरूच आहे. विविध विकासकामांसाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाने दिला आहे. या निधीतून विकासकामांचा शुभारंभ होणार आहे.

राज्यातल्या नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी सध्या आचारसंहिता लागू आहे. अर्ज स्वीकारण्यासही सुरुवात झाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यास अद्याप कालावधी आहे, पण त्यापूर्वीच मुंबईत मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद या नावाखाली साडेआठ कोटी रुपयांचा निधी नगरविकास विभागाने दिला आहे.

निवडणुकांवर डोळा

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर डोळा ठेवत महायुती सरकारने विविध नगर परिषदा व नगर पंचायतींवर निधीची खैरात केली आहे. या निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी नगरविकास विभाग व नियोजन विभागाने तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिकचा निधी व कामे मंजूर केली आहेत. वैशिष्टय़पूर्ण योजना, रस्ते, बांधणी, खेळाची मैदाने, खुले सभागृह अशा विविध कामांसाठी 1 हजार 222 कोटी 97 लाख रुपयांचा निधी दिली आहे. हा निधी देताना विरोधकांच्या मतदारसंघांना डावलून सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्र्यांच्या जिह्यांवर निधीची खैरात होत आहे.

Comments are closed.