वसईच्या टोलनाक्यासाठी सरनाईकांनी दिलेल्या पत्राला गडकरींची केराची टोपली
दहिसरचा टोलनाका वसईच्या वर्सोव्यात स्थलांतरित करण्यासंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या पत्राला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केराची टोपली दाखवली आहे. दहिसर पथकर नाका महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या मार्गावर असून वर्सोवा पुलाजवळून जाणारा मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत येत असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने याला विरोध केला आहे. तसे पत्रच गडकरींनी सरनाईक यांना पाठवले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खूश करण्यासाठी टोलनाका वसईकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरनाईकांना झटका बसला आहे.
वाहतूककोंडी सोडवण्याच्या नावाखाली दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हालचाली करत हा पथकर नाका वर्सोव्यात स्थल ांतरित करण्यासाठी ससूनवघर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा केला होता. त्यावेळी भूमिपुत्र फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांच्यासह शेकडो स्थानिक गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरत सरनाईकांच्या मनसुब्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर सरनाईकांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करत टोलनाक्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र गडकरी यांनी सरनाईक यांना पत्र पाठवून राष्ट्रीय महामार्गावर वसई येथे हा टोलनाका स्थलांतरित करण्यास परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भूमिपुत्र संघटनेच्या लढ्याला यश आले आहे.
दहिसर जकात नाक्याची जागा बिल्डरच्या घशात घातली
दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्यावरून आता शिंदे गट व भाजपमध्ये जोरात जुंपली आहे. वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, दहिसर टोलनाक्याशेजारी जकात नाक्याची जागा होती. ही जागा जर टोलनाक्याला दिली असती तर वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा सुटला असता, परंतु काही सुपीक डोक्याच्या लोकांनी ही जकात नाक्याची जागा बिल्डरच्या घशात घातली. आता हा टोलनाका वसईत हलवण्याच्या त्यांच्या हालचाली आहेत, पण हा टोल नाका वसईतच काय, दहिसर परिसराच्या आजूबाजूलाही हलवता येणार नाही असे ठणकावून सांगितले
Comments are closed.